मुख्यमंत्र्यांचे आगमन लांबणीवर;मंत्रीमंडळ सल्लागार समितीला पुन्हा मुदतवाढ

0
1105

 गोवा खबर:उपचारासाठी अमेरिकेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे मे महिन्याच्या अखेरीस गोव्यात परततील अशी अटकळ बांधली जात होती.मात्र मंत्रीमंडळ सल्लागार समितीला देण्यात आलेल्या जून अखेर पर्यंतच्या मुदतवाढीमुळे मुख्यमंत्री जून अखेर गोव्यात परत येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार हाकण्यासाठी नेमलेल्या 3 मंत्र्यांच्या समितीची मुदत मे अखेर  संपणार आहे,या पार्श्वभूमीवर काल या समितीला 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
या समितीची मुदत 30 जून पर्यंत वाढवली असल्याने मुख्यमंत्री जून अखेर गोव्यात परततील याचे संकेत मिळू लागले आहेत.

मुख्यमंत्री पर्रिकर यांनी घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नवीन व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा देण्या बरोबरच केंद्रातील मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यात झालेल्या विकस कामांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत 13 मे रोजी झालेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देणारा व्हिडिओ संदेश प्रसारीत केला होता.त्यात त्यांनी आपल्यावरील उपचार योग्य पद्धतीने सुरु असून येत्या एक दोन आठवड्यात आपण गोव्यात परतणार असल्याचे म्हटले होते.त्यानंतर 17 दिवसांनी घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणखी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे.
पर्रिकर यांनी उपचारासाठी अमेरिकेला रवाना होताना एक,त्यानंतर अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात दूसरा आणि आज घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तीसरा व्हिडिओ प्रसारीत केला आहे.
आजच्या व्हिडिओ मध्ये पर्रिकर थकल्यासारखे जाणवत आहेत.जुलै मध्ये पावसाळी अधिवेशन घ्यावे लागणार आहे.त्यात पर्रिकर यांना उपस्थित रहायचे झाल्यास त्यांना पुरेशी विश्रांती घेऊन ठणठणीत व्हावे लागणार आहे.पर्रिकर यांची प्रकृती बिघडल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 दिवसात गुंडाळावे लागले होते.त्या अधिवेशनातील उर्वरीत कामकाज पावसाळी अधिवेशनात भरून काढावे लागणार आहे.
मुख्यमंत्री पर्रिकर नेमके केव्हा गोव्यात परत येणार याबाबत कोणीच अधिकृतपणे माहिती देत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.आजच्या व्हिडिओ मध्ये पर्रिकर यांनी आपण गोव्यात कधी परतणार याचा उल्लेख केलेला नाही.
मुख्यमंत्री अमेरिकेतून महत्वाच्या फाइल्स क्लियर करत असून सरकारी कामकाज सुरळीत सुरु असल्याचा दावा भाजप नेते करत असले तरी 3 महीने मुख्यमंत्र्यांशिवाय सरकारी कारभार ठप्प झाला असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेस कडून केला जाऊ लागला आहे.पर्रिकर यांच्या गैरहजेरीचा फायदा उठवत विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे.राज्यपालां भेटून सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी द्या अशी केलेली मागणी असो किंवा इंधन दरवाढ, मुख्यमंत्र्यांशिवाय 100 दिवस आणि जन मन गण आंदोलन असो भाजपवर टिका करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही.
आता तर पुर्ण वेळ मुख्यमंत्री नेमावा अशी मागणी काँग्रेस नेते राष्ट्रपतींना भेटून करणार आहेत.पर्रिकर यांचे आगमन आणखी लांबल्याने विरोधक त्याचा फायदा उठवतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.आणखी एक महीना भाजप आणि सत्ताधारी आघाडीला पर्रिकर यांच्या गैरहजेरीचा बचाव करावा लागणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.