मुख्यमंत्र्यांची नवीन गणवेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी

0
1015

गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन गणवेशात पणजी येथील कार्यक्रमाला हजेरी लावून सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले.निमित्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू चेतना संगम कार्यक्रमाचे.सज्जन शक्ती सर्वत्र ही संकल्पना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताने गोव्यात 18 ठिकाणी हिंदू चेतना संगम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी सरसंघचालक सुभाष वेलिंगकर यांनी बंड करून कोकण प्रांताला आव्हान देत स्वतःची वेगळी संघटना बनवल्यापासून गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चर्चेत होता.वेलिंगकर यांच्या सोबत बरेच  स्वयंसेवक गेल्यामुळे गोव्यातील संघाला मोठे भगदाड पडले आहे.आजच्या कार्यक्रमात देखील त्याचा परिणाम दिसून आला.आजच्या कार्यक्रमात उपस्थिती फारच कमी होती.वेलिंगकर आणि त्यांच्या समर्थकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
नवीन गणवेशातील मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले
5 वाजता सुरु होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पावणे पाच वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन गणवेशात हजेरी लावून उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले.पर्रिकर गोव्यातील कार्यक्रमात कधीच बूट घालत नाहीत मात्र आज मुख्यमंत्री काळ्या रंगाचे लेदरचे बूट घालून कार्यक्रमाला उपस्थित होते.त्याशिवाय फूल खाकी पँट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता जो संघाचा नवीन गणवेश आहे.इनशर्ट आणि बूट घालून आलेले पर्रिकर आपल्या या वेशभूषेत हटके दिसत होते. त्यांच्या सोबत पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पर्रिकर यांनी कार्यक्रम स्थळी आल्यानंतर उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला.पर्रिकर यांनी जमीनीवर न बसता कार्यक्रमाच्या ठिकाणी मांडलेल्या खुर्चीवर बसून पूर्ण कार्यक्रमात भाग घेतला.वंदन आणि प्रार्थना म्हणताना ते इतर स्वयंसेवकां प्रमाणे उभे राहून त्यात सहभागी झाले होते.कार्यक्रम संपल्या नंतर देखील पर्रिकर यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. छोट्या मुलांना त्यांनी टोपी कशी घालावी,दंड कसे मारावेत याची माहिती दिली. फोटो आणि सेल्फी काढून घेणाऱ्यांना देखील त्यांनी हसत खेळत प्रतिसाद दिला.