मुख्यमंत्र्यांची गोमेकॉत झाली तपासणी

0
1873
गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आज बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल मध्ये नियमित तपासणी करण्यात आली.तपासणी नंतर मुख्यमंत्री दोनापावल येथील आपल्या खाजगी निवासस्थानी परतले आहेत.
सप्टेंबर मध्ये गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचने नुसार विशेष विमानाने दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल झाले होते.तेथे 29 दिवस उपचार घेऊन मुख्यमंत्री गोव्यात परतल्या पासून दोनापावल येथील आपल्या खाजगी निवासस्थानी उपचार आणि विश्रांती घेत आहेत.एम्स मधून स्ट्रेचर वरुन आणतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या पासून त्यांच्या प्रकृती बद्दल उलट सुलट चर्चा सुरु झाली होती.विरोधी पक्ष काँग्रेसने मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या प्रकृती बाबत व्हिडिओ पुरावे आणि मेडिकल बुलेटिन जारी करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री पर्रिकर यांनी सलग 3 दिवस बैठका घेऊन त्याला उत्तर दिले होते.गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि मंत्रीमंडळाच्या बैठकीचे फोटो अधिकृतरित्या जारी करून मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती सुधारत असून त्यांनी हळूहळू काम सुरु केल्याचे दाखवून देत काँग्रेसच्या विरोधाची धार कमी करण्याचा पर्यंत करण्यात आला होता.
गेले काही दिवस दोनापावल येथील आपल्या खाजगी घरी उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री पर्रिकर यांना आज सकाळी नियमित तपासणीसाठी गोमेकॉ मध्ये दाखल करण्यात आले होते.तपासणी पूर्ण होताच त्यांना घरी जाऊ देण्यात आले,अशी माहीती मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव रूपेश कामत यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यपाल मृदुला सिन्हा या दिल्लीहून परतल्यानंतर दाबोळी विमानतळावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. जीव कासावीस झाल्याने तेथूनच त्यांना बांबोळी इस्पितळात तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नंतर त्यांना इस्पितळातून घरी जाऊ देण्यात आले. पर्रीकर व सिन्हा या दोघांची प्रकृती स्थीर असल्याचे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले.