मुख्यमंत्र्यांचा बेकायदेशीर धंदा व आरोग्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारानेच गोव्यात कोविडने हाहाकार माजला : गिरीश चोडणकर

0
528
गोवा खबर : आगामी २०२२ विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्ष प्रचंड मताधिक्क्याने सत्तेत येणार हे स्पष्ट आहे. भ्रष्ट, बेजबाबदार व असंवेदनशील भाजप सरकारची उलटी गणती सुरू झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा  बेकायदेशीर धंदा व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या  भ्रष्टाचारानेच गोव्यात कोविडने हाहाकार माजवला असा गंभिर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी थिवी येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केला.
थिवी गट कॉंग्रेस समितीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पक्ष सोडुन भाजपात गेलेल्या दहा आमदारांना कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस पक्षात परत घेणार नाहीत असे स्पष्ट केले. आता पक्षांतराचा विषाणू कायमचा नश्ट करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
थिवी गट कॉंग्रेसचे अध्यक्ष उदय साळकर यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी कोविड संकट काळात लोकांना मदत करण्याचे चांगले कार्य करीत असल्याचे सांगुन गिरीश चोडणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आज संपुर्ण गोव्यातील इतर राजकीय नेते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यास तयार असुन, थिवी गट समितीने मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करावे असे आवाहन त्यांनी केले. थिवी मतदारसंघात कॉंग्रेस नक्कीच चमत्कार करणार असे सुचक विधान गिरीश चोडणकर यावेळी केले.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षानी यावेळी सदस्य नोंदणी तसेच अग्रणी संघटनांच्या कार्याचा आढावा घेतला. आगामी विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांना सुचना केल्या. थिवी मतदारसंघातील कॉंग्रेसचे हितचींतक व जाणते सदस्य यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेवून कार्यक्रम आखावेत असे गिरीश चोडणकर म्हणाले.
यावेळी उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, जिल्हा पंचायत उमेदवार, उमाकांत कुडणेकर, गट अध्यक्ष उदय साळकर, एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी आपले विचार मांडले. बैठकीला उत्तर जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष चंदन मांद्रेकर, समाज माध्यम प्रमुख हिमांशू तिवरेकर हजर होते.
थिवी मतदारसंघातील कोविड मृतांच्या घरी भेट देवून कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व गट समितीने त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.