मुख्यमंत्र्यांकडुन दोन महान गोमंतकीयांचा जाहिर अपमान : अमरनाथ पणजीकर

0
58
गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अर्धवट ज्ञानाने राज्यपालपद भुषविलेल्या पद्मविभूषण ॲंथनी लॅंसलोट डायस व माजी लष्कर प्रमुख सुनीथ फ्रांसिस रॉड्रिग्स या दोन महान गोमंतकीयांचा अपमान झाला असुन, मुख्यमंत्र्यानी यापुढे कोणतेही वक्तव्य करण्यापुर्वी पुस्तके वाचावीत व इतिहासाचे ज्ञान घ्यावे अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
गोव्याचे राजेंद्र आर्लेकर हे राज्यपालपदी नेमणुक झालेले पहिले गोमंतकीय असल्याचे वक्तव्य डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते त्याचा खरपुस समाचार घेताना अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
गोव्याचे महान सुपुत्र पद्मविभूषण ॲंथनी डायस यांनी १९६९ ते १९७१ पर्यंत त्रिपूराचे नायब राज्यपाल म्हणुन व १९७१ ते १९७७ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणुन सेवा बजावली आहे. जनरल सुनीथ रॉर्डिग्स  यांनी पंजाबचे राज्यपाल म्हणु  २००४ ते २०१० पर्यंत कार्यभार सांभाळला आहे असे अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणुन दिले आहे.
आज डॉ. प्रमोद सावंतां सारखेच भाजपचे अनेक “मोदीफायड भक्त” भारत देश सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतरच जन्माला आला अशा भ्रमात वावरत आहेत. त्या सर्वांनी इतिहासाची पुस्तके वाचणे गरजेचे असुन, त्यामुळे अनेक नामवंत गोमंतकीयांचे देशासाठीचे योगदान त्यांना कळेल असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातील चुक लक्षात आणुन दिल्यानंतरही डॉ. प्रमोद सावंतांनी सदर चूक सुधारली नाही यावरुन  मुख्यमंत्र्याचा मधांदपणा व हेकेखोरपणा उघड झाला आहे असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठवुन त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. एनएसयुआयने मुख्यमंत्र्याना इतिहासाचे धडे देण्यासाठी खास वर्ग आयोजित करण्याची तयारी दाखवुन, प्रधानमंत्री व भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना डॉ. प्रमोद सावंत यांना सदर वर्गात हजेरी लावण्यास सोपे जावे म्हणुन मुख्यमंत्र्यांच्या जबाबदारीतुन मुक्त करावे अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही तिव्र निषेध करतो व त्यांनी ताबडतोब देशासाठी खुप मोठे योगदान दिलेल्या दोन महान गोमंतकीयांचा अपमान केल्या प्रकरणी जाहिर माफी मागावी अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे केली आहे.