मुख्यमंत्री 15 जून रोजी गोव्यात परतणार;आमदार काब्राल यांची माहिती

0
1380
गोवा खबर :अमेरिकेत स्वादुपिंडावरील विकारावर उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर 15 जून रोजी गोव्यात परतणार असल्याची खात्रीशीर माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी आज गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या एका कार्यक्रमात बोलताना दिली.
 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कधी एकदा गोव्यात येतात असे काही मंत्र्यांना झाले आहे. येत्या 15 रोजी मुख्यमंत्री अमेरिकेहून गोव्यात परतण्याची शक्यता आहे.18 जूनच्या सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होतील अशी माहिती पुढे येत आहे.मुख्यमंत्र्यांच्या गैरहाजरीचा फायदा उठावत विरोधी पक्ष काँग्रेसने अनेक मुद्दे उपस्थित करून भाजप आघाडी सरकारची कोंडी करण्याचा केलेला प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झालेला दिसून आलेला आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर हे  16 मार्च रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तीन मंत्र्यांची समिती  मंत्रिमंडळ सल्लागार म्हणून नेमली होती. त्यापैकी एक मंत्री फ्रांसिस डिसोझा हे आपल्या खात्याचा कारभार अमेरिकेत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवून पोर्तुगालला गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ सल्लागार समिती सध्या दोनच जणांची राहिली आहे. गेले वीस दिवस या समितीची एकही बैठक झालेली नाही.राज्यकारभाराची घडी विस्कटली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
भाजपचे आमदार निलेश काब्राल यांनी मंगळवारी पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलताना  पर्रीकर  15 रोजी गोव्यात परतणार असल्याचे सांगितले असले तरी सरकारी पातळीवरुन त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.18 जूनच्या कार्यक्रम पत्रिकेत मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर असणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवस गोव्यात होते. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीमुळे गोव्यात विकास कामे ठप्प होत आहेत काय असे पत्रकारांनी गडकरी यांना विचारले असता, तसे काही ठप्प झालेले नाही असे ते म्हणाले. मुख्यमंत्री नाहीत म्हणून विकास कामे थांबलेली नाहीत. गोव्यातील अन्य सर्व मंत्री कार्यक्षम आहेत आणि ते कामे पुढे नेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सध्याच्या घडीला मुख्यमंत्री उपचारासाठी अमेरिकेत,वीजमंत्री पांडूरंग मडकईकर ब्रेन स्ट्रोक मूळे मुंबईत हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत.नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा दीर्घ रजेवर पोर्तुगालला गेल्यामुळे विचित्र परिस्थिती ओढवली आहे.
मुख्यमंत्री पर्रिकर 15 तारीखला गोव्यात परत येणार तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भव्य कार्यक्रम केला जाईल आणि त्या कार्यक्रमास आपण हजेरी लावेन असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 13 मे रोजी पणजी येथे झालेल्या बूथ मेळाव्यात जाहिर केले आहे.त्या मेळाव्यात पर्रिकर यांनी व्हिडिओ संदेश पाठवून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.त्या नंतर घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा देणारा आणखी एक व्हिडिओ संदेश मुख्यमंत्र्यांनी जारी केला होता.आता पर्यंत मुख्यमंत्री पर्रिकर यांनी 3 व्हिडिओ संदेश जारी केले आहेत.
मुख्यमंत्री आजारी पडल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 दिवसात गुंडाळावे लागले होते.त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे उरलेले कामकाज पावसाळी अधिवेशनात भरून काढावे लागणार आहे.मुख्यमंत्री पर्रिकर यांना तब्बेत सांभाळून पावसाळी अधिवेशन पार पाडण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.