मुख्यमंत्री मे अखेरीस गोव्यात परतणार

0
1261
गोवाखबर: मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्बेत आता चांगलीच सुधारली आहे.मे महिन्याच्या अखेरीस ते गोव्यात परतणार आहेत,अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव रूपेश कामत यांनी  दिली आहे.
कामत हे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते.परवाच ते गोव्यात परतले आहेत. कामत म्हणाले,मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्बेत आता सुधारली आहे.त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत.गोव्यातील महत्वाच्या कामाच्या फाइल्स ते रोजच्या रोज हाता वेगळ्या करत आहेत.
पर्रिकर यांच्यावर उपचारापैकी काही उपचार शिल्लक असून ते ठरल्या प्रमाणे नियोजित वेळेत केले जाणार आहेत.पर्रिकर सध्या अमेरिकेत एका अपार्टमेंट मध्ये वास्तव्याला असून आठवड्यातून एकदा त्यांची हॉस्पिटल मध्ये नियमित तपासणी केली जात आहे.सध्याच्या वेळापत्रका प्रमाणे मुख्यमंत्री मे अखेरीस गोव्यात परतणार आहेत,अशी माहिती कामत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावे फिरत असलेला संदेश हा निव्वळ खोडसाळपणा आहे.अॅपल चे सीईओ स्टीव्ह जॉब यांचा संदेश पर्रिकर यांच्या नावे पसरवला जात असून तो संदेश पर्रिकर यांचा बिल्कुल नाही असे कामत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार चालवणाऱ्या 3 मंत्र्यांच्या कॅबीनेट सल्लगार समितीची मुदत 30 एप्रिलला संपली होती.मुख्यमंत्री मे अखेरीस गोव्यात परतणार असल्याने या समितीची मुदत कालच 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकारी कारभार ठप्प झाला असल्याची टिका विरोधकां कडून केली जात आहे.