मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज

0
1269
गोवा खबर:शनिवारी रात्री तब्बेत खालवल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मंगळवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला.

मुख्यमंत्री पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने गेले वर्षभर आजारी आहेत.त्यांच्यावर गोवा,मुंबई ,दिल्ली आणि अमेरिकेत उपचार करण्यात आले आहेत.सध्या देखील दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार सुरु असतात.शनिवारी रात्री त्यांची तब्बेत खालवल्याने त्यांना तातडीने बांबोळी येथील गोमेकॉ मध्ये दाखल करण्यात आले होते.

गोमेकॉच्या वरिष्ठ डॉक्टरांचे पथक मुख्यमंत्र्यांवर उपचार करत होते.दरम्यान रविवारी अचानक दिल्ली येथील एम्सच्या डॉक्टरांचे पथक गोव्यात बोलावण्याचे ठरले.सायंकाळी पावणे सहा वाजता एम्समध्ये असताना मुख्यमंत्र्यांवर उपचार केलेले डॉ. प्रमोद गर्ग आणि त्यांचा एक सहकारी गोमेकॉत दाखल झाले.डॉ. गर्ग यांनी पूर्वीच्या पद्धतीने नव्याने उपचार सुरु करताच मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारु लागली.रविवार आणि सोमवारी एम्सच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पर्रिकर यांच्यावर उपचार करण्यात आले.
सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बरे वाटले असल्याने घरी जाऊ देण्याची विनंती केली होती.मात्र ती फेटाळून त्यांना आणखी एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली गोमेकॉ मध्ये ठेवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारु लागल्या नंतर एम्सचे डॉक्टर माघारी गेले.मंगळवारी पुन्हा एकदा तपासणी करून पर्रिकर यांच्या तब्बेतीचे सगळे पॅरामीटर स्थिर असल्याची खात्री पटताच सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुख्यमंत्री पर्रिकर डिस्चार्ज मिळाल्या नंतर दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी गेले असून तेथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित उपचार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री पर्रिकर यांची तब्बेत बिघडताच राजकीय वर्तुळात हालचाली तेज झाल्या होत्या.शनिवारी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांची तब्बेत बरी असल्याचा निर्वाळा दिला होता.मात्र काही तासा नंतर त्यांना गोमेकॉ मध्ये दाखल करावे लागले होते.गोमेकॉत दाखल असताना पर्रिकर यांच्या तब्बेती बद्दल उलट सुलट चर्चा सुरु होती.त्यातच सोमवारी पक्षाचे संघटन सचिव गोव्यात आल्याने राजकीय पातळीवर उलथा पालथ तर होणार नाही ना अशी चर्चा रंगू लागली होती.मात्र पर्रिकर यांना मंगळवारी डिस्चार्ज मिळाल्या नंतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाळा.