मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर दिल्लीतील एम्स मध्ये उपचार सुरु

0
1309
 गोवा खबर:कांदोळी येथील दुकले हॉस्पिटलमध्ये 4 दिवस उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आज दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीटय़ूट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स) मध्ये  दाखल करण्यात आले आहे. तेथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पर्रिकर यांच्यावर उपचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 पर्रिकर यांना पचना संदर्भात तक्रार असल्याची  सांगितले जात आहे. चार दिवसां पूर्वी पर्रिकर कांदोळी येथील दुकले हॉस्पिटल मध्ये दाखल झाले होते.तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने सगळेच चिंतेत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी पर्रीकर यांनी काल सायंकाळी संपर्क साधला होता.त्यानंतर शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना दिल्लीतील एम्स संस्थेत दाखल व्हावे, असा सल्ला दिला होता. त्यानुसार एम्स संस्थेत जाण्याचा निर्णय पर्रीकर यांनी काल रात्री घेतला. पर्रीकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. आज सकाळी साडेदहा वाजता या विमानाने पर्रिकर गोव्याहून दिल्लीला गेले. दुपारी पर्रीकर एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले.
 एम्समधील  खासगी वॉर्डमध्ये  पर्रिकर यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. पर्रीकर आपल्या वरील उपचारासाठी तीनवेळा  अमेरिकेला जाऊन आले आहेत. दोनवेळा ते मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. गोव्यात गोमेकॉ आणि आता कांदोळी येथील दुकले हॉस्पिटल मध्ये त्यांनी उपचार घेतले आहेत. तिसऱ्यांदा अमेरिकेतुन परतल्या नंतर पर्रिकर पुन्हा मंत्रालयात सक्रिय होतील अशी अपेक्षा होती मात्र प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना मंत्रालयात जाऊन काम करणे शक्य होत नव्हते.दोनापावल येथील खाजगी निवासस्थानाहुन तर कधी हॉस्पिटल मधूनच ते आपल्या खात्याच्या फाइल्स क्लियर करत होते.
 पर्रीकर एम्समध्ये दाखल झाल्यानंतर राजकीय हालचालीनी वेग घेतला आहे . पर्रीकर हे आपल्याकडील  अतिरिक्त खाती सर्व मंत्र्यांमध्ये वितरित करणार असल्याची माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी दिली आहे. पर्रीकर यांनी आज सकाळी दिल्लीस निघण्यापूर्वी आपल्याला व सभापती प्रमोद सावंत यांना तसे सांगितले असल्याचे लोबो म्हणाले.
दरम्यान पर्रिकर यांच्या आजारपणामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी बी.एल. संतोष आणि विजय पूराणीक हे उद्या गोव्यात दाखल होणार असून ते आपला अहवाल पक्ष प्रमुखांना सादर करतील असे सांगितले जात आहे.