मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी मुंबईत 

0
1193
गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना काल  अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. बुधवारीच पर्रीकर अमेरिकेतून गोव्यात आले होते.
काल त्यांना उलटी होऊ लागल्याने मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना त्वरित मुंबईला हलवण्यात आले. काल सायंकाळी 4.15 च्या  विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचा छोटा मुलगा व डॉ. कोलवाळकर मुंबईला गेले आहेत. पुढील दोन दिवस त्यांच्यावर लिलावती इस्पितळात उपचार केले जातील.
सध्या नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही अमेरिकेलाच उपचारांसाठी गेले आहेत. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले तीन महिने मुंबईतील इस्पितळात उपचार घेत आहेत. गोव्याचे दोन मंत्री अनुक्रमे आरोग्य मंत्री विश्वजित राणो व कृषी मंत्री विजय सरदेसाई हे विदेशात खासगी भेटीवर गेले आहेत. सरदेसाई येत्या 26 रोजी परततील तर दि. 2 सप्टेंबरला आरोग्य मंत्री राणे गोव्यात दाखल होतील. गेले काही आठवडे मंत्रिमंडळाच्या बैठकाही होऊ शकलेल्या नाहीत.आजारी मंत्र्यांचा परिणाम प्रशासकीय कामावर होऊ लागला आहे.
अमेरिकेतील स्लोन केटरिंन इस्पितळात 11 दिवस उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री 22 रोजी गोव्यात दाखल झाले होते. येताना माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी घेऊन ते गोव्यात आले. आज ते अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते.मात्र अचानक उपचारासाठी मुंबईत जावे लागल्याने इतर नेत्यांच्या हस्ते अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करावे लागणार आहे.