मुख्यमंत्री पर्रिकर पुढील उपचारासाठी आज अमेरिकेस होणार रवाना

0
1018
गोवा खबर : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दुसऱ्या टप्प्यातील उपचारांसाठी आज अमेरिकेला रवाना होणार आहेत. आज सायंकाळी ते दाबोळी विमानतळावरून मुंबईला व तेथून रात्री अमेरिकेला प्रयाण करतील. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर असणार आहेत. मुख्यमंत्री १८ ऑगस्टला पुन्हा गोव्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैर हजेरीत स्वातंत्र्य दिन सोहळा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र पाठवून  आपल्या अमेरिका दौऱ्याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकेतून नियमितपणे राज्यातील अधिकाऱ्यांशी फोन किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधून आपण प्रशासन हाताळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव कृष्णमूर्ती मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासकीय फाईल्स हाताळणार आहेत. या संबंधीचा आदेश आज जारी होण्याची शक्यता आहे. १३, १४ व १५ ऑगस्ट असे तीन दिवस पर्रीकर यांच्यावर अमेरिकेत उपचार होणार आहेत. डॉक्टरांकडून त्यांची फेरतपासणी केली जाईल तसेच त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढील वैद्यकीय उपचार निश्चित केले जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, स्वादुपिंडाच्या (पॅनक्रायटीस)  आजारामुळे मुख्यमंत्री पर्रीकर ८ मार्चपासून न्यूयॉर्कमधील इस्पितळात उपचार घेत होते. तीन महिन्यांच्या उपचाराची फेरी पूर्ण करून ते १४ जून रोजी गोव्यात दाखल झाले होते. त्याआधी १४ फेब्रुवारी रोजी पोटदुखीचा त्रास जाणवल्यामुळे पर्रीकर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झाले. त्यानंतर पुन्हा १५ फेब्रुवारीला गोमेकॉत गेल्यानंतर तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील लिलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथील उपचारांनंतर २२ फेब्रुवारी रोजी ते गोव्यात परतले. त्याच दिवशी विधानसभेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला व काही महिन्यांसाठी लेखानुदानही मंजूर करून घेतले. त्यानंतर काही दिवस गोव्यात विश्रांती घेऊन ते पुन्हा मुंबईला उपचारांसाठी गेले आणि तेथून ७ मार्चला न्यूयॉर्कला रवाना झाले. जाण्यापूर्वी गोव्यात कामकाज पाहण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा या तिघांची मंत्रिमंडळ सल्लागार समिती स्थापन केली होती.
नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य सध्या आजारी आहेत. आपल्या अनुपस्थितीत पदभार देण्यासाठी एकही ज्येष्ठ मंत्री नसल्याची परिस्थिती मुख्यमंत्री पर्रीकरांवर उद्भवली आहे. त्यामुळेच त्यांनी यावेळी मंत्रिमंडळ सल्लागार समिती स्थापन न करता स्वत:च फोन आणि ई-मेलद्वारे प्रशासन हाताळण्याची तयारी केली आहे.