मुख्यमंत्री चिमूटभर कोळसा सहन करू शकत नाहीत, तर मग 16 लाख गोवेकरांना तो तोंडात घेण्यास का भाग पाडत आहेत? : राहुल म्हांबरे

0
159
गोवा खबर:कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे दुपदरीकरणाचा घाट सरकारने घातला असून कोळशामुळे गोव्याचे सौंदर्य बिघडून जाणार आहे.गोवा हा गोमंतकीयांचा असून अडानीचा नाही,अशा घोषणा देत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी धडक मारली.निवेदना सोबत मुख्यमंत्र्यांना कोळसा देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्या नंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे दुपदरीकरण केले जात असल्याचा आरोप करत निमंत्रक राहुल म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली आपच्या कार्यकर्त्यांनी चर्च चौकातून जोरदार घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने धडक दिली.
 पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या जवळ कार्यकर्त्यांना अडवल्या नंतर  कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. जवळपास अर्धा तास निदर्शने केल्यानंतर म्हांबरे व टेळेकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
पोलिसांच्या या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हांबरे यांनी जनतेकडे मते मागण्यासाठी येताना सावंत यांनी लोकांची परवानगी घेतली होती का,असा सवाल केला.
 आपच्या सदस्यांनी निदर्शने करताना सेटिंग सेटिंग, सीएम फटिंग आमका जाय, सोबीत गोंय आमका जाय, गोयांत कोळसो आमका नाका, अशा घोषणा दिल्या. आपच्या सदस्यांनी कोळसा असलेली छोटीशी पिशवी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी आणली होती. पण पोलिसांनी ती त्यांना पुढे घेऊन जाऊ दिली नाही.
उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हांबरे म्हणाले, मुख्यमंत्री गोवेकरांच्या माथी 15 दशलक्ष टन कोळसा मारत आहे तोही जबरदस्तीने गोव्याच्या लोकांना न विचारता. आम्ही आणलेला मूठभर कोळसा ते का घेऊ शकत नाहीत. आम्ही सावंत यांना निवेदन देण्यासाठी आलो असून गोवा हा गोवेकरांचा आहे, अदानींचा नव्हे  हेही सांगायला आलो आहोत.
 हा कोळसा मुख्यमंत्री गोव्यातील जनतेवर लादत आहेत. तर मग ते स्वतः त्याचा अनुभव का घेऊ शकत नाहीत,असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी संदेश तेलेकर, राहुल म्हांबरे, वेन्झी व्हिएगस,मारियो कोरदेरीयो यांच्यासह आप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना आगशी पोलीस स्थानकात नेले.सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली.