मुख्यमंत्री उपचारासाठी दिल्लीस रवाना

0
1284
गोवा खबर:अमेरिकेतुन तिसऱ्यांदा उपचार घेऊन आल्या नंतर देखील प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने गेले चार दिवस कांदोळी येथील खाजगी दुकले हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल केले जाणार आहे.मुख्यमंत्री विशेष विमानाने दाबोळी विमानतळावरुन दिल्लीस रवाना झाले असून त्यांच्यावर पुढील उपचार एम्स मध्ये केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह वीज मंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा हे मंत्रीमंडळातील सहकारी आजारी असल्याने राज्यासाठी चिंतेची बाब बनली आहे.पर्रिकर यांच्याकडे सर्व महत्वाची खाती असून त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने राज्याच्या कारभारावर परिणाम होत होता.विरोधी पक्ष काँग्रेसने याच मुद्द्यावरुन भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालू ठेवले आहेत.त्याचा दबाव सरकारवर वाढू लागला होता.
7 सप्टेंबर रोजी अमेरिकेतुन गोव्यात येऊन देखील मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊन आपला कार्यभार सांभाळू शकले नव्हते.गेले 4 दिवस ते आपले नातेवाईक असलेल्या डॉ दुकले यांच्या कांदोळी येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते.
पर्रिकर दरवर्षी न चुकता आपल्या पर्रा येथील मुळ घरच्या गणपतीला हजेरी लावत असतात.यंदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना घरी जाणे शक्य झाले नव्हते.काल सायंकाळी 4 वाजता त्यांनी हॉस्पिटल मधून निघुन विसर्जना पूर्वी फक्त गणपतीला नमस्कार करून आल्या पावली माघारी फिरणे पसंत केले होते.
मुख्यमंत्री आणि इतर 2 मंत्र्यांच्या आजारपणा मुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काल भाजपच्या गाभा समितीची तातडीची बैठक झाली.बैठकी नंतर सदस्यानी दुकले हॉस्पिटल मध्ये येऊन पर्रिकर यांची भेट घेऊन महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. पाठोपाठ घटक पक्षांचे नेते विजय सरदेसाई,सुदिन ढवळीकर,अपक्ष मंत्री रोहन खवंटे, गोविंद गावडे यांनी देखील पर्रिकर यांची हॉस्पिटल मध्ये येऊन भेट घेतली.
 रात्री उशिरा पर्यंत भेटीगाठी आणि राजकीय घडामोडी सुरुच होत्या.सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पर्रिकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी फोन वरुन संपर्क साधून पद सोडण्याची तयारी दर्शवली होती.मात्र पर्यायी व्यवस्था होई पर्यंत आपणच पदावर रहा असा सल्ला शहा यांनी पर्रिकर यांना दिल्याचे समजते.
त्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पर्रिकर यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करण्याचे ठरले.आज सकाळी मुख्यमंत्री पर्रिकर हॉस्पिटल मधून निघण्यापूर्वी  कळंगुटचे आमदार माइकल लोबो आणि सभापती प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री पर्रिकर आज आपल्या कडील अतिरिक्त खाती मंत्रीमंडळामधील इतर मंत्र्यांकडे सोपवणार असल्याचे लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर सांगितले आहे.

मुख्यमंत्री दिल्लीत उपचार घेत असताना नवीन नेता निवडून राज्य सरकारचा कारभार चालवला जातो की अन्य व्यवस्था करून पर्रिकरच दिल्ली मधून कारभार पाहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.भाजपचे निरीक्षक येत्या 2 दिवसात गोव्यात येऊन परिस्थितीवर तोडगा काढण्याची शक्यता आहे.