मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने कायदा सुव्यस्था बिघडली:चोडणकर

0
464
गोवा खबर : एका निष्पाप व्यक्तीला रस्त्यावर जिवंत जाळले जाते आणि मुलीला समाजकंटकांकडून जंतुनाशक प्यायला लावले जाते, ही भयावह स्थिती म्हणजे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा पुरावा आहे, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस सामितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
युवक काँग्रेसने आज पर्वरी पोलिस स्थानकावर धडक देत सामाजिक कार्यकर्ते मेथर यांच्या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना आलेल्या अपयशा बद्दल पोलिस निरीक्षकांना जाब विचारत निदर्शने केली.
 दिवसेंदिवस राज्यात वाढत चाललेल्या गुन्ह्यांकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले आहे. सततच्या गुन्हेगारीमुळे गोवा असुरक्षित बनले आहे. लोकांना स्वत: च्या घरातदेखील घाबरवून सोडले आहे.
तोरडा – पर्वरी येथे रस्त्यावर फिरत असलेल्या एका व्यक्तीला भरदिवसा पेट्रोल  ओतून जाळून ठार करण्यात आले तर चांदर – गिरदोली येथे मुलीला रस्त्यात अडवून जंतुनाशक प्यायला भाग पाडले गेले. शिरदोण किनाऱ्यावर एका बालिकेचा छिन्नविछिन्न  मृतदेह आढळून आला. या व अशा अनेक गुन्ह्यांचा वेळीच तपास लावून खटले मार्गी लावण्यात पोलिस यंत्रणा वारंवार अपयशी ठरली आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली.
 चोडणकर म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे राज्यात  अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. सतत ढिलाई करण्याच्या गृहमंत्र्यांच्या वृत्तीने गृहखात्यावरील त्यांनी आपली पकड गमावली असून त्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे.
 एकीकडे कोविड -१९ नंतरची लढाई लढण्यास, आर्थिक कामे पुन्हा सुरू करण्यात, बेरोजगारीची समस्या सोडविण्यास, कायदा व सुव्यवस्थेची ग्वाही देण्यास, समाजकल्याण योजना सुरू ठेवण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांकडून लोकांना पोकळ आमिषे दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न होत आहे. ठोस काहीही न करता लोकांना खोटी आश्वासने दिली जात आहेत, असा आरोप  चोडणकर यांनी केला.
लॉकडाऊनमध्ये ठप्प पडलेला पर्यटकांचा हंगाम पुन्हा सुरू करण्याच्या नावाखाली,पर्यटक येण्यापूर्वीच किनारी भागात ड्रग पेडलर्स नेहमीच्या ठिकाणी परत येऊन बसले आहेत, याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले आहे.
चोडणकर म्हणाले , किनारपट्टीवर अंमली पदार्थांचा व्यवहार पुन्हा जोरदार  सुरू असल्यासारखे वातावरण आहे आणि त्याचा बंदोबस्त होण्याऐवजी काही भागांत पोलिसांचे गुन्हेगारांशी साटेलोटे दिसून येत आहेत.
 किनारपट्टीवर बेकायदा व्यवहारासह अनेक गुन्हे वाढले आहेत. पर्यावरण, अभयारण्य धोक्यात आले आहेत. बाहेरील घटकांना राज्य विकण्यासाठी सरकारी पातळीवर सर्व काही तयार असल्याने विविध संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.  गोव्याचा कोळसा प्रदूषणापासून बचाव, शेतीची जमीन, पर्यावरण रक्षण यासाठी लोक गावागावात आंदोलन करत आहेत. पण मुख्यमंत्री मात्र मरिनासारख्या प्रकल्पांना पुनर्जीवित करण्याच्या त्यांच्या ‘जनहित विरोधी’  कारवायांमध्ये व्यस्त आहेत, असे चोडणकर म्हणाले.
राज्याच्या या ढासळत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या व भावी पिढ्यांच्या हितासाठी  गोव्याचे रक्षण करण्यास कठोर सुधारात्मक उपाययोजना करावी किंवा जमत नसल्यास विनाविलंब पायउतार व्हावे,अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.