मुंबई-गोवा क्रुझ सेवा पावसाळ्यानंतर सुरु :गडकरी

0
1094

मांडवीवरील तिसऱ्या पुलाचे ८५ टक्के काम पूर्ण

गोवा खबर:मांडवी नदीवर बांधण्यात येणाऱ्या तिसऱ्या पुलाचे ८५ टक्के काम आज औपचारिकरीत्या पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुलाचा शेवटचा स्लॅब, एस२७ लावण्यात आला. हा पूल भारतातील तिसरा सर्वात मोठा पूल आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडवी नदीवरील हा देशातील एक आयकॉनिक पूल असल्याचे सांगितले. हा पूल बांधण्याचे काम करता येणे, हे आपले सौभाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. पुलाची माहिती देताना गडकरी म्हणाले कि, याची बांधकाम गुणवत्ता अतिशय उत्तम आहे. शिवाय ‘मेड इन इंडिया’चे मॉडेल आहे. हा पूल म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न आहे; त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग असताना देखील याची जबाबदारी त्यांनी राज्य सरकार तर्फे घेतली होती. असे असले तरी केंद्र सरकारने या पुलाच्या बांधकामासाठी ५० टक्के रक्कम दिली. हा पूल निसर्गरम्य गोवा राज्याच्या सौंदर्यात भर घालेल, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.

यासोबतच झुआरी पुलाबद्दल माहिती देताना गडकरी यांनी सांगितले कि, झुआरी नदीवरील पूल देखील आयकॉनिक पूल बनेल; या पुलावरून संपूर्ण गोव्याचे दर्शन होईल. या पुलावर जाण्यासाठी लिफ्टची सोय असेल व हा पूल एक जागतिक पर्यटन स्थान ठरेल.

महामार्ग विकसित करत असताना केवळ रस्ते चांगले बंधने नाही तर त्याची रचना, सोईसुविधा देखील उत्तम हवे, हा आग्रह असल्याचे गडकरी यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग ४ अ ची कामे सुद्धा लवकरच पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. याशिवाय मडगाव बायपास वरील अडचणीवर उपाय काढला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री आज निश्चित आनंदी असतील, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

मुख्य कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले कि, महामार्ग विकास करताना काही झाडे कापली गेली असली तरी त्याची हानी अधिक झाडे पुरवून भरण्यात येईल. सामाजिक संस्था व स्थानिक प्रशासनाने पुढे येऊन या झाडांच्या वाढीमध्ये हातभार लावावा, असे वाहन गडकरी यांनी केले. आपण कायम हरित महामार्गांचा आग्रह धरत असल्याचे त्यांनी सांगितले.

तांत्रिक कारणांमुळे सुरु न झालेली मुंबई-गोवा क्रुझ सेवा पावसाळ्यानंतर सुरु होईल, असे देखील त्यांनी सांगितले.