मिलिंद नाईकांकडे नगरविकास तर काब्राल नवे वीज मंत्री

0
1518
 गोवा खबर: कुडचडेचे आमदार मिलिंद नाईक यांच्याकडे नगरविकास, समाज कल्याण व प्रोव्हेदोरीया तर नीलेश काब्राल यांच्याकडे वीज, अपारंपरिक ऊर्जा, कायदा व विधीमंडळ व्यवहार खाती देण्यात आली आहेत.
२००७ पासून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले मिलिंद नाईक हे २०१२ मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये वीजमंत्री होते. २०१७ मध्ये निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. पण पर्रीकर यांनी अनिवासी भारतीय आयुक्त हे कॅबिनेट दर्जा असलेले पद दिले होते. नाईक यांच्याकडे वीजखाते देण्याचे निश्चित झाले होते पण मागीलवेळी कामगिरी उत्तम नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी नगर विकास हे तेवढेच महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे दिले.
कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे २०१२ पासून भाजपाचे कुडचडे मतदारसंघातून आमदार आहेत. पहिल्याच टर्ममध्ये ते गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. २०१७ मध्ये सरकार आल्यानंतर काब्राल यांच्याकडे पुन्हा हेच महामंडळ दिले गेले. विशेष म्हणजे अभियंता असलेले काब्राल यांच्याकडे मंत्री झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी कायदा व विधीमंडळ व्यवहार ही महत्त्वाची खातीही दिली आहेत.
आजारी डिसोझा,मडकईकर यांना हटवले
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राजभवनात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकस महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त मिलिंद नाईक यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या आजारपणामूळे विरोधकांनी आजारी सरकार अशी टिका करत प्रशासकीय कारभार ठप्प झाल्याचा आरोप करत सरकारला घेरले होते.
तिसऱ्यांदा अमेरिकेतुन उपचार घेऊन आल्या नंतर देखील मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊन आपले काम करू शकत नव्हते.दरम्यानच्या काळात कांदोळी येथील दुकले हॉस्पिटल मध्ये 4 दिवस उपचार घेऊन सुद्धा प्रकृतीत अपेक्षित सुधार होत नसल्याने पर्रिकर यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार खास विमानने पर्रिकर यांना दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पर्रिकर यांनी पद सोडण्याची इच्छा दाखवल्या नंतर शहा यांनी रामलाल,बी.एल. संतोष आणि विजय पूराणीक या तिघांना निरीक्षक म्हणून गोव्यात पाठवून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला होता.
निरीक्षकांनी दिलेल्या अहवालावर तिन्ही खासदारां सोबत निरीक्षकांच्या उपस्थितीत चर्चा केल्यानंतर काल शहा यांनी ट्वीट करत पर्रिकर हेच मुख्यमंत्री पदी कायम राहतील असे कळवले होते.
त्यानंतर आज लगेच डिसोझा आणि मडकईकर यांना आजारपणाच्या कारणास्तव हटवून त्यांच्या जागी काब्राल आणि नाईक यांची मंत्री मंडळात वर्णी लावली.
डिसोझा यांना मंत्रीमंडळा मधून हटवण्याचा निर्णय रुचलेला नाही.त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून एकनिष्ठ राहिल्याचे हेच फळ काय असा सवाल भाजपला केला आहे.दरम्यान प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी डिसोझा पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते पक्षाची प्रतिमा बिघडेल असे कोणतेही कृत्य करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी डिसोझा यांना वगळल्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खातीवाटप आणि मंत्री मंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा प्रभारी बी.एल. संतोष आणि विजय पुराणीक गोव्यात दाखल झाले आहेत.दोघांनी आज शपथविधी सोहळ्याला देखील हजेरी लावली आहे.घटक पक्षांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर हेच खातेवाटप आणि फेर रचने बाबत अंतिम निर्णय घेतील,असे तेंडुलकर यांचे म्हणणे आहे.
मडकईकर आणि डिसोझा हे उत्तर गोव्यातील मंत्री होते.त्यांना वगळल्याने उत्तर गोव्यातील 2 मंत्री कमी होऊन नाईक आणि काब्राल यांच्या रूपाने दक्षिण गोव्यातील 2 मंत्री वाढले आहेत.
लोकसभा निवडणूकीत भाजपला दक्षिण गोव्याची जागा जड जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे दोन मंत्र्यांच्या रुपात भाजपची ताकद वाढवण्या बरोबर घटक पक्षांना पर्रिकर यांच्याकडील अतिरिक्त खाती वाटून त्यांची साथ लोकसभा निवडणुकी वेळी मिळवणे हे ध्येय बाळगुन भाजपने पावले टाकली असल्याचे मानले जात आहे.
मंत्रीमंडळ फेरबदल आणि खाती वाटप आठवड्या भरात होईल अशी शक्यता,प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे.खातीवाटप झाल्या नंतर सरकारी कारभार रुळावर येईल असे मानले जात आहे.
मंत्रीमंडळ फेररचनेवर फ्रान्सिस डिसोझा नाराज
भाजपाशी २० वर्षे निष्ठा ठेवली त्याचे हे मला फळ मिळाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त करत भाजप मध्ये मंत्रीमंडळ फेर रचनेनंतर ऑल इज नॉट वेलचे चित्र दिसेल याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फ्रान्सिस डिसोझा यांना फोन करून त्यांच्या कडील मंत्रिपद काढून ते दुसऱ्या आमदाराकडे दिले जाणार असल्याचे कळवले. त्यावर नाराज झालेल्या डिसोझा यांनी आपण या निर्णयाने खुश नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
डिसोझा म्हणाले,मी फक्त एक महीना माझ्या मंत्री पदाच्या कामापासून दूर आहे.पक्ष माझे आजारपण महीनाभर सुद्धा सहन करू शकत नाही याचे वाइट वाटते.मी आज देखील मंत्री म्हणून काम करण्यास सक्षम आहे.पर्रिकर यांनी स्वतः मला अमेरिकेत उपचारासाठी पाठवले असताना असे घडणे अनपेक्षित आहे.
स्थानिक पत्रकारांशी अमेरिकेतुन फोनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डिसोझा म्हणाले, मला जेव्हा मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणले होते आणि माझी खाती कमी केली होती तेव्हाच मला पुढे कधीतरी असे होणार याची कल्पना आली होती. पक्षातील काही लोकांना मी नकोसा झालो आहे.
 मी भाजपासाठी २० वर्षे निष्ठेने काम केले त्याचे हे फळ आहे अशा शब्दात डिसोझा यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
डिसोझा म्हणाले,नीलेश काब्राल हे सहा महिन्यांपूर्वीच आपण नगर विकास मंत्री होणार असे आपल्या जवळच्या लोकांना सांगत होते तेव्हाच मला कुणकुण लागली होती. आज मुख्यमंत्र्यांनी जेव्हा फोन करून माझे मंत्रिपद दुसऱ्याला दिले जात आहे असे सांगितले, जे मला अपेक्षित होते.
६४ वर्षीय डिसोझा हे सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. यापूर्वी ते भाजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेत. १९९९ मध्ये राजीव काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले डिसोझा हे त्यानंतर २००२, २००७, २०१२ व २०१७ ची निवडणूक भाजपाच्या उमेदवारीवर लढले व जिंकले. २०१२ मध्ये ते पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले.