मिरांडा हाऊस चित्रपटाचे 19 एप्रिलला गोव्यात प्रदर्शन

0
1139
गोवा खबर: मिरांडा हाऊस या द्वैभाषिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून तो 19  एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेंद्र तालक यांचे दिग्दर्शन मिरांडा हाऊसला लाभले आहे. गोव्यातील सर्व सिनेमागृहांमध्ये 19  एप्रिल रोजी तो प्रदर्शित केला जाईल.
राजेंद्र तालक क्रिएशन्सद्वारे कोकणीत आणि आयरिस प्रॉडक्शन्सद्वारे मराठीतील चित्रपट प्रदर्शित होईल. संपूर्ण चित्रीकरण गोव्यातील मडगाव, बेतलभाटी व वेलसांव या ठिकाणी केले आहे. झी-मराठी फेम पल्लवी सुभाष, मिलींद गुणाजी, सैंकित कामत, प्रिन्स जॅकोब, जॉन डिसिल्वा, अवधुत सहकारी, संजय तलवडकर, संजीव प्रभू, माधवी देसाई आणि अनिल रायकर यांनी या चित्रपटात भुमिका केल्या आहेत.
आजपर्यंत राजेंद्र तालक यांनी दिग्दर्शित व निर्मित केलेल्या आलिशा, अंतर्नाद, शीतू, सावरिया डॉट कॉम, ओ मारिया, अ रेनी डे या कोकणी चित्रपटांना तर सावली, सावरिया डॉट कॉम व अ रेनी डे या मराठी चित्रपटांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. मिरांडा हाऊसमध्ये प्रमुख भुमिकेत संकेत (साईंकित) कामत दिसणार असून तो महाराष्ट्र व गोव्यात खूपच लोकप्रिय आहे. रात्रीस खेळ चाले, तुझं माझं ब्रेकअप या झी-मराठीवरील मालिकांमधील आणि ह्या गोजिरवाण्या घरात या नाटकातील त्यांच्या भुमिकांना रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. कोकणी व मराठीत डब केलेला हा त्याचा चित्रपट आहे.
मिरांडा हाऊसमध्ये मिलिंद गुणाजी यांची भुमिकाही महत्वाची असून ते मूळ गोमंतकिय आहेत हे अनेकांना ठाऊक नसेल. 1993 मध्ये पपीहा या चित्रपटात त्यांनी पहिली भुमिका केली. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या फरेब या चित्रपटातील इन्स्पेक्टरच्या भुमिकेने त्यांना लोकप्रिय केले. त्यांनी मराठी, कन्नड, तेलगु, पंजाबी व हिंदी चित्रपटांमधून भुमिका केल्या आहेत. झी-मराठीवरील भटकंती ही मालिका लोकप्रिय झाली आणि त्यांनी इतिहास व प्रवासवर्णनांवर 7 पुस्तके लिहिली आहेत. कोकणी या मातृभाषेत त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे, हे विशेष.
रेवा, चोर बनी थंगट कारे, फॅमिली सर्कस, गुजराती वेडींग इन गोवा, अपने तो धीरूभाई अशा गुजराती चित्रपटांद्वारे प्रख्यात झालेले गोमंतकीय सूरज कुराडे हे मिरांडा हाऊसचे सिनेमाटोग्राफर आहेत. क्वीन, बॉडीगार्ड, बर्फी, स्री आणि अनेक चित्रपटांसाठी मुख्य सहाय्यक डीओपी म्हणून त्यांनी काम केले आहे.
सेंट झेवियर कॉलेज आणि पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या वर्धन धायमोडकर यांनी मिरांडा हाऊसचे संपादन केले आहे. नाळ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केले आहे, ही गोवेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.