मिथेन गॅस हायड्रेट, उर्जेचा नवा स्रोत भारतातही उपलब्ध: राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

0
1024

 

गोवाखबर: मिथेन गॅस हायड्रेट हा एक स्फटिक द्रव पदार्थ आहे; ज्यामध्ये मूलत: कमी प्रमाणातील हायड्रोकार्बन वायूसह, पाणी व मिथेन वायू असतो. हा उच्च दाब व कमी तपमानामध्ये समुद्राच्या तळाशी तयार होतो. या मिथेन गॅस हायड्रेटचा पर्यायी उर्जा स्रोत म्हणून भविष्यात वापरात येऊ शकतो, असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. दोन पावला येथील संस्थेच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज ही माहिती देण्यात आली.

 

भारतामध्ये १९९७ पासून या विषयातील संशोधन सुरु आहे. परंतु प्रत्यक्ष स्वरुपातील गॅस हायड्रेट प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहे. जपान, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, मेक्सिको यासारख्या देशांमध्ये देखील पूर्वीपासून या विषयात संशोधन सुरु आहे. पण इतर देश आणि भारतीय संशोधनातील मुलभूत फरक म्हणजे इतर देशातील तापमान थंड असल्याने हा वायू सहजपणे सापडतो. पण भारतीय हवामानात हा वायू सागरी तळाशी जमणाऱ्या गाळाखाली (sediment) तयार होतो. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांना यासाठी विशेष प्रयत्न करावा लागला.

 

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने हा वायू कसा, कोठे तयार होतो यासंदर्भातील अभ्यास केला. आधी केलेल्या अभ्यासातून बंगालच्या उपसागरामध्ये  विविध ठिकाणी गॅस हायड्रेट उपलब्ध असू शकतो, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. त्यादिशेने अभ्यास केला असता चार ते पाच अशी ठिकाणे कळाली, जेथे हा वायू मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता अधोरेखित झाली. त्यादृष्टीने कृष्णा-गोदावरी बेसिनमध्ये संशोधन केले गेले. त्यानंतर महानदी, कावेरी व अंदमान येथे संशोधन करण्यात आले. त्यापैकी कृष्णा-गोदावरी बेसिनमध्ये लक्ष केंद्रित केले गेले. त्यासाठी १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१८ दरम्यान राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतर्फे संशोधन मोहीम आयोजित कण्यात आली होती. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने विकसित केलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानाच्या सहायाने मिथेन गॅस हायड्रेट नेमका कोठे आहे, हे लक्षात आले. सर्वेक्षणानंतर काही नमुने समुद्रातून प्रयोगशाळेत आणण्यात आले.

 

भारतीय संशोधन क्षेत्रात ही एक मोठी व महत्वाची कामगिरी मानली जात आहे. कारण भविष्यात पर्यायी उर्जा स्रोत अथवा इंधन म्हणून याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. हा वायू वापरासाठी मिळण्याकरिता काय मार्ग आहेत, हे पाहण्याचे; तसेच त्याकरिता तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन आता शास्त्रज्ञांपुढे आहे. सोबतच या वायूच्या परिणामांचा देखिल अभ्यास या पुढील काळात करणे आवश्यक आहे.

 

पुढील काळात महानदी, कावेरी मुन्नार, अंदमान शिवाय गंगेच्या क्षेत्रात या संदर्भातील अभ्यास करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने यावेळी सांगितले. गंगेच्या क्षेत्रात या वायूचे मोठे साठे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दिशेने शोधकार्य करण्यात येईल.