मिकींचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

0
847

गोवाखबर:माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे निर्बधित असलेल्या किनारपट्टीवर बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या प्रकरणात अटक होईल या भीतीने त्यांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पाशेको यांच्या विरोधात  वेर्णा पोलिसात दखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. पाशेको यांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकावर हजर रहाण्यासाठी पोलिसांनी समन्सही जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर पाशेको यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज उद्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायनोरा लाड यांच्यासमोर सुनावणीस येणार आहे.

मागच्या रविवारी ही वादग्रस्त घटना घडली होती. पाशेको आपली एसयुव्ही गाडी घेऊन  बेताळभाटी बीचवर आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा धक्का बसून वॉटरस्पोर्टस्चा व्यवसाय चालविणा-या मिलरॉय डिसिल्वा याच्या पॅराशूटची नासधुस केल्याची तक्रार कोलवा पोलीस स्थानकात दाखल झाली होती. त्यानंतर पाशेको किनारपट्टीवरुनच जवळच असलेल्या उतोर्डा बिचवर गेल्याचा आरोप असून त्याच्या या कृतीचे व्हिडीओ शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला असता डिसिल्वा याला शिवीगाळ व धमक्या दिल्याच्या आरोपाखाली वेर्णा पोलीस स्थानकावरही गुन्हा नोंद झाला आहे. याच प्रकरणात आपल्याला अटक होईल या भीतीने पाशेको यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.