माहिती आदान-प्रदान कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

0
139

 

 गोवा खबर: प्रुडंट मिडीयातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत इंडिया अहेड यांच्यासमवेत माहितीच्या आदान-प्रदानाचा करार करण्यात आला. यामुळे गोव्याची माहिती राष्ट्रीय व्यासपीठावर देण्याची संधी प्रुडंट मिडीयाला प्राप्त झाली आहे.

यावेळी, कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, प्रुडंट मिडीयाचे संपादक श्री. प्रमोद आचार्य, इंडिया अहेडचे मुख्य संपादक व सह-मालक श्री. भुपेंद्र चौबे, व्यवस्थापकीय संपादक श्री. गौतम मूथा आणि माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. सुधीर केरकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, या करारामुळे राज्य सरकारचे यश आणि राज्याच्या सकारात्मक गोष्टी राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यास मदत होईल. तसेच, यामुळे पर्यटनालाही अतिरिक्त चालना मिळेल. उभरत्या क्रीडापटूंनाही याद्वारे ओळख मिळेल असे ते म्हणाले.

 गोवा व्यवसाय करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे, याला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांतर्फे प्रसारमाध्यमांना आवाहन करण्यात आले.  सरकार व्यवसाय सुलभीकरणासाठी (ईझ ऑफ डूइंग बिझिनेस) त्यामध्ये आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही ते पुढे म्हणाले.

कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांनी, पत्रकारिता आणि जनता यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण संबंधांची गरज आहे हे अधोरेखित करून पत्रकारिता हा एक दुवा आहे जो राज्यातील लोकांना सरकारशी जोडत असतो, असे म्हटले. या उपक्रमातून गोव्यातील कला व संस्कृती राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचेल, असेही ते पुढे म्हणाले.

यावेळी प्रुडंट मिडीयाचे संपादक श्री. प्रमोद आचार्य, इंडिया अहेडचे मुख्य संपादक व सह-मालक श्री. भुपेंद्र चौबे, व्यवस्थापकीय संपादक श्री. गौतम मूथा यांनीही आपले विचार व्यक्त केले.

 जो लुईस व  अर्जुन पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.