मास्क न घालता गोव्यात पर्यटन करणार असाल तर सावधान!

0
268
 गोवा खबर:अनलॉक सुरु होताच देश भरातून पर्यटक गोव्यात येऊ लागले आहे.ठीकठीकाणच्या किनाऱ्यांसह इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटक फिरताना दिसू लागले आहेत.कोविडचे संकट संपले नसल्याने जे पर्यटक मास्क शिवाय फिरताना आढळतात त्यांच्यावर कारवाई होऊ लागल्याने गोव्यात जीवाचा गोवा करण्यासाठी येणाऱ्याना त्याची दखल घ्यावी लागणार आहे.

लॉकडाउन संपल्या नंतर अनलॉक सुरु होताच देश भरातून पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत.गोव्यात येण्यासाठी कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र किंवा कोविड चाचणीची गरज नसल्याने पर्यटक गोव्यात येण्यास पसंत करू लागले आहेत.हॉटेल, रेस्टोरेन्ट आणि बार सुरु झाल्याने पर्यटन उद्योग हळूहळू रुळावर येऊ लागला आहे.
रविवारी दुपारी पणजी येथील चर्च पाहण्यासाठी कर्नाटक मधून आलेल्या एका गटाला मास्क न घालता फिरणे महागात पडले.पणजी मनपाने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना प्रत्येकि 100 रुपये दंड ठोठावला.
  • यासंदर्भात माहिती देताना पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले,पणजीत चर्च समोर मास्क न घालता फिरणारे 15 पर्यटक दिसल्या नंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोविड संकट कायम असल्याने मास्क वापरणे, शारीरिक दूरी राखणे आणि सॅनिटायझर्सचा वापर करणे आवश्यक आहे.प्रत्येकाने जबाबदारीने त्याचे पालन करायला हवे.राज्य सरकारने गोव्याच्या प्रवेशद्वारांवर पर्यटकांना सूचना देणारे फलक उभारावेत,अन्यथा कोणी पर्यटक नियमभंग करत असतील तर त्यांच्यावर यापुढे देखील अशीच कारवाई सुरु ठेवली जाणार आहे.
दरम्यान,मीरामार किनाऱ्यावर नियमभंग करून फिरणाऱ्यांवर सोमवारी सायंकाळी विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याचा विचार असल्याचा इशारा महापौर मडकईकर यांनी दिला आहे.