माशेल येथे तिसऱ्या महामराठी संमेलनाचे आयोजन

0
764
 गोवा खबर:गोवा मराठी अकादमीतर्फे 31 मार्च रोजी माशेल येथे तिसऱ्या महामराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.संमेलेनाचे उद्धाटन प्रसिद्ध मराठी लेखक आणि अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती,गोवा मराठी अकादमीच्या कार्यकारीणीचे सदस्य वल्लभ केरकर यांनी आज दिली.
गोवा मराठी अकादमीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केरकर म्हणाले,माशेल येथील श्रीदेवकीकृष्ण सभागृहात महामराठी संमेलन होणार आहे.संमेलनाचे उद्धाटन सकाळी 10 वाजता झाल्या नंतर 11.30 वाजता मराठीचा वसा आणि भविष्याची दिशा या विषयावर परिसंवाद होणार आहे.डॉ. सचिन कांदोळकर परिसंवादाचे अध्य्क्षपद भूषवणार असून उषा परब,जयप्रभू कांबळे आणि अनघा देशपांडे सहभागी होणार आहेत.
दुपारी 12.30 वाजता गोमंतकीय युवा कलाकारांच्या नाट्य,नृत्य व संगीताच्या जुगलबंदीचा उगवाईचे रंग हा कार्यक्रम होणार आहे.
भोजनेत्तर सत्रात अभिराम भडकमकर यांची प्रकट मुलाखत डॉ. अजय वैद्य घेणार आहेत.साडे तीन वाजता होणारे कविसंमेलन पुष्पाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून गोव्यातील नामवंत कवी यात सहभागी होणार आहेत.
सायंकाळी साडे चार वाजता समारोप सोहळा होणार आहे.संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने महामराठी संमेलनाला यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी अकादमीने गेल्या 3 वर्षात घेतलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.