माशेलकरांसारखे अनेक शास्त्रज्ञ गोव्यातून देशाला मिळोत: मुख्यमंत्री

0
1805

गोवा विज्ञान केंद्रामध्ये केले ‘इनोव्हेशन हब’चे उद्घाटन

गोवा खबर:‘‘इनोव्हेशन हब’ सारख्या उपक्रमातून प्रयोगशाळेतील साहित्य प्रत्यक्ष हाताळण्याची सुवर्णसंधी तुम्हा विद्यार्थ्यांसाठी चालून आली आहे; त्याचा लाभ सर्व मुलामुलींनी घ्यावा आणि रघुनाथ माशेलकरांप्रमाणे अनेक शास्त्रज्ञ गोव्यात घडावेत’, अस्गी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोवा विज्ञान केंद्र येथे व्यक्त केली.  

गोवा विज्ञान केंद्रातर्फे सुरु करण्यात आलेल्या नवप्रवर्तन हब अर्थात ‘इनोव्हेशन हब’चे औपचारिक उद्घाटन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी कोणाकोणाला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, असा प्रश्न विचारून उपस्थित विद्यार्थ्यांना बोलण्यास उद्युक्त केले. विज्ञान संबंधित सर्व विषयांना येथे प्रत्यक्ष व हवे तितका वेळ हाताळा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. शिक्षण खात्याशी बोलून सर्व विद्यार्थ्यांना ‘इनोव्हेशन हब’ला भेट देता येईल, असे आयोजन करण्यासंबंधी सूचना देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून पुण्यातील डेक्कन कॉलेजचे उप कुलपती तसेच नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एस. शिंदे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रमुख प्रा. सुनिल कुमार सिंग व नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईचे संचालक एस. एम. खेनेड उपस्थित होते.

डॉ. व्ही. एस. शिंदे यांनी यावेळी आपले विचार मांडताना सांगितले की, आपली शिक्षण पद्धती ही परीक्षा केंद्रित आहे, जी ज्ञानाशिवाय पदवीधर तयार करत आहे, याची जाणीव युजीसी व केंद्र सरकारला झाली होती; हि परिस्थिती बदलणे आवश्यक असून खरी हुशारी, बौद्धिक क्षमता पुढे येण्यासाठी संधी निर्माण करायला हव्या, हे देखील लक्षात आले. त्यातून नीती आयोगाने विचार करून अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले. इतिहासातील संशोधनातील आणि शिक्षण क्षेत्रातील भारताचे स्थान पुन्हा प्राप्त करायचे आहे; भारत शिक्षण क्षेत्रात सर्वात पुढे असेल, हे चित्र लवकरच पाहायला मिळेल, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात सुरु करण्यात आलेला हा उपक्रम इयत्ता ५ वी ते १२ वी तसेच विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वार्षिक रुपये एक हजार इतके माफक शुल्क भरून या उपक्रमाचे सदस्यत्व मिळणार आहे.