मायकल लोबोंचे लोकायुक्तांचा अपमान करणारे वक्तव्य म्हणजे घटनात्मक संस्था नष्ट करण्याच्या भाजपच्या धोरणाचे प्रतिबींब : गिरीश चोडणकर

0
165
गोवा खबर: भाजप सरकारच्या  मोदी-शहा जोडगोळीने आपल्या हुकूमशाही व दादागीराच्या बळावर देशातील लोकशाही तत्वांना हरताळ फासला आहे.  मंत्री मायकल लोबो यांचे  लोकायुक्त पि. के. मिश्रा यांचा अपमान करणारे वक्तव्य म्हणजे देशातील घटनात्मक संस्था नष्ट करण्याच्या भाजपच्या धोरणाचे प्रतिबींब आहे, अशी टिका काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 
मोदी-शहा जोडीने देशातील प्रत्येक घटनात्मक संस्था व वैधानिक अधिकारणीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या व भाजपच्या राजकीय फायद्यासाठी दबावतंत्राचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकरणांतील अंतीम निकाल व आदेश फिरवण्याचे काम हे दोघे करीत आले आहेत. त्यांना मदत करणाऱ्यांना नंतर राज्यपाल पद, भाजपची उमेदवारी, मंत्रीपद बक्षीसी म्हणुन देण्याची पद्धत या दोघांनी सुरू केली आहे,असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
चोडणकर म्हणाले,केंद्रात सत्तेत आल्यापासुन मोदी-शहा यांची जोडी सिएजी, सीबीआय, इडी, एनसीबी, संरक्षण तसेच न्यायपालीका यात हस्तक्षेप करीत आहे. राफेल, लोकसभा निवडणुकांवेळी मोदी व शहा कडुन आचारसंहीतेचा भंग, बिहार निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी सुषांत सिंग राजपुत आत्महत्येला दिलेली कलाटणी, निवडणुका जवळ असलेल्या राज्यांत काॅंग्रेस नेत्यांवर टाकण्यात येणारे छापे ही सर्व मोदी-शहांच्या राजकीय दबावतंत्राच्या खेळीचा भाग आहेत.
आज भ्रष्टाचार युक्त भाजप सरकारकडुन सत्याचे पालक लोकायुक्तांचे निकाल स्विकारणे कठिणच आहे. गोव्याचे डिफेक्टीव्ह मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत हे भ्रष्ट मनोहर पर्रिकरांचा वारसा पुढे नेत आहेत. स्व. मनोहर पर्रिकरांनी नेहमी केवळ आपली व्यक्तिगत छबी उंचावण्यासाठी गोव्याच्या हिताकडे तडजोड केली असा आरोप चोडणकर यांनी केला.
झिरो टाॅलरंस टू करप्शन म्हणणाऱ्या भाजपने आता त्यात परिवर्तन करुन त्याचे भ्रष्टाचाराला १०० टक्के प्रोत्साहन असे मोदीफीकेशन करावे असा टोला  चोडणकर यांनी लगावला  आहे.
भाजपचे धोरण लक्षात ठेवुन, मंत्री मायकल लोबो यानी त्यांच्या विरूद्धच्या प्रकरणात सोयीस्कर निकालासाठी लोकायुक्तांना मुदतवाढ वा इतर ठिकाणी नेमणुक करण्याचा प्रस्ताव दिला असावा. परंतु, प्रामाणीक व कर्तव्यदक्ष लोकायुक्तांनी सदर प्रस्ताव नाकारून मायकल लोबो यांची चांगलीच कान उघाडणी केल्याने आपला अहंकार दुखावल्यानेच आता लोबो आकडतांडव करुन तो मी नव्हेच होण्याचा प्रयत्न करीत आहेत असा दावा  चोडणकर यांनी केला आहे.
काॅंग्रेस पक्ष लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाना पत्र लिहुन लोकायुक्तांनी दिलेल्या २१ अहवालांची स्वेच्छा दखल न्यायालयाने घ्यावी व कोर्टाच्या देखरेखेखाली चौकशी करण्याची मागणी करणार आहे,असे चोडणकर म्हणाले.
काॅंग्रेस पक्षाचे सरकार २०२२ मध्ये स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम या सर्व अहवालांची जलद चौकशी करुन, सबंधीत भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे  चोडणकर यांनी स्पष्ट केले.