मायकल अस्त्रामुळे भाजप घायाळ; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

0
1497
गोवा खबर:आजारपणामूळे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची सरकार वरील पकड ढिली पडू लागली आहे.सरकारच्या अनास्थेवर आता जोतो आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करू लागला आहे.मंत्रीमंडळा मध्ये समावेश न झाल्याने नाराज असलेल्या उपसभापती मायकल लोबो यांनी शुक्रवारी दिवसभरात केलेल्या शाब्दीक हल्ल्याने अनेक भाजप नेते घायाळ झाले आहेत.भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जात असून लोबो यांनी त्याच शिस्तीला आव्हान दिल्यामळे मायकल विरोधात पक्षात नाराजीची लाट  निर्माण झाली आहे. मायकल अस्त्राची दखल घेणे दिल्ली येथे उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही भाग पडले आहे. पर्रिकर यांनी लोबो यांच्याशी संवाद साधून त्यांच्या नाराजीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.
लोबो यांच्या टीकेची दखल घेऊन त्यांना तत्काळ दिल्लीला बोलाविण्यात आल्याची माहिती मिळाली. पण दिल्लीत नेमके काय घडले, याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. यासंबंधी मायकल लोबो यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही याप्रकरणी मौन धारण केले आहे.
शुक्रवारी दिवसभरात दोनवेळा मायकल लोबो यांनी सरकार व भाजप नेत्यांवर तोफ डागल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे. त्याचबरोबर आयुष मंत्री श्रीपाद नाईक व खासदार नरेंद्र सावईकर यांच्यावर केलेली जाहीर टिका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना खाण अवलंबितांना भडकावणारे भाषण करून भाजपला अडचणीत आणल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये लोबों विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
शुक्रवारी आझाद मैदानावर लोबो यांनी केलेल्या भाषणाची व्हिडिओ लिंक केंद्रीय नेते व मुख्यमंत्री पर्रीकर यांना पाठवून देण्यात आली आहे. त्याचबरोबर लोबो यांनी दिवसभरात सरकार व भाजप नेत्याविरोधात केलेल्या विधानाबाबत केंद्रीय नेत्यांना माहिती देण्यात आली आहे. लोबो यांनी मुख्यमंत्री व दोन्ही खासदारांनाच टार्गेट केल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. भाजप गाभा समितीमध्येही याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील खाण व्यवसाय सुरु झाला नाही तर भाजपच्या दोन्ही खासदारांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्जही भरु नये, असे स्पष्ट करीत  लोबो यांनी खाण अवलंबितांच्या आंदोलनात भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री  नाईक व  सावईकर यांच्यांवर टीका केली होती. आपण पूर्णपणे खाण अवलंबितांच्या पाठिशी असून खाण प्रश्न सुटला नाही तर प्रसंगी राजीनामा देण्यास तयार असल्याचेही  सांगून भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
 गोव्यात बेकारीची मोठी समस्या आहे.  ही समस्या आपण सरकारच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण लोकांना या सरकारकडून भरपूर अपेक्षा आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपला आवाज मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि ते नोकऱ्यां संदर्भात लवकर निर्णय घेतील, अशी अपेक्षा लोबो यांनी व्यक्त केली आहे.  सरकारी नोकऱ्यां मध्ये 3 हजार जागा भरायच्या आहेत. या जागा त्वरित भरायला हव्या. निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करायला हवे असे सांगत सरकार सध्या जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप लोबो यांनी केला आहे.
शुक्रवारी सकाळी लोबो यांनी म्हापसा येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली होती. भाजप सरकार कसे असफल व निष्क्रीय बनले आहे याचा पाढाच त्यांनी जाहीररित्या वाचला होता. लोबो यांचा टीकेतून खुद्द मुख्यमंत्र्यांनाही सोडले नव्हते.