मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

0
614

                       

                                           

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य देण्याचा आदेश संबंधित सरकारी  यंत्रणेला दिला. त्याचप्रमाणे पावसाळ्यात सखल भागात येणारा पूर टाळण्यासाठी पावले उचलण्याचे सांगितले.

      मान्सून तयारीचा आढावा घेण्यासाठी सचिवालयातील परिषदगृहात आयोजित केलेल्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करण्याचेही आदेश दिले.

      मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या तसेच पंचायत आणि जलस्त्रोत खात्याच्या अधिका-यांना नाले व गटारे उपसण्याचे काम हाती घेण्याचेही आदेश दिले. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाण्यामुळे उद्भवणा-या रोगासंबंधी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाला दिल्याचे ते म्हणाले.

      यावेळी सार्वजनिक बांधकाम खाते, वीज, जीएसआयडीसी, अग्नीसेवा आणि इतर संबंधित खात्यांच्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

      महसूल सचिव श्री संजय कुमार आयएएस यांनी २०२० मान्सूनपूर्व तयारीचा आढावा तसेच आपत्ती व्यवस्थापन संबंधित इतर विषयांचाही आढावा घेतला.

      बैठकीस महसूलमंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात, मुख्यसचिव श्री परिमल राय, आयएएस, सरकारचे सचिव, उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी खात्यांतील प्रमुख आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.