मानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण : पंतप्रधान मोदी

0
1397
The Prime Minister, Shri Narendra Modi being presented the “Champions of The Earth” award by the Secretary General of the United Nations, Mr. Antonio Guterres, at a function, in New Delhi on October 03, 2018.

 

 

संयुक्त राष्ट्रांनी काल मला’ चॅम्पियन्स ऑफ दी  अर्थ ‘या पुरस्काराने सन्मानित केले. अतिशय विनम्रपणे मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा केवळ एका व्यक्तीचा पुरस्कार नाही असे मला वाटते. निसर्गाशी सलोखा राखणाऱ्या जीवन पद्धतीवर भर देणाऱ्या  भारतीय संस्कृती आणि मूल्यांची घेतलेली ही दखल आहे.

 

हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी भारताने घेतलेल्या सक्रीय पुढाकाराची,संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एन्तोनीओ ग्युटेर्स आणि यू.एन.इ.पी  चे कार्यकारी संचालक  एरिक सोल्हेम यांनी दखल घेऊन त्याची प्रशंसा केली हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.

मानव आणि निसर्ग यांच्यात एक आगळे नाते आहे. निसर्ग माता आपले पालन पोषण करते. पहिली मानवी संस्कृती नदीच्या काठावर वसली. निसर्गाशी नाते जोडून त्याच्याशी सलोखा राखत उदरनिर्वाह करणाऱ्या  समाजाने प्रगती आणि भरभराट अनुभवली.

आज मानवी समाज एका महत्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. आपण  ज्या मार्गाचा स्वीकार करू, त्यावर  केवळ आपलेच नव्हे तर आपल्यानंतर या ग्रहावर वास्तव्य करणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांचे कल्याण ठरणार आहे. आपली लालसा आणि गरजा  यातला  असमतोल आपल्याला  पर्यावरणाच्या  तीव्र असमतोलाकडे नेत आहे. एकतर याचा स्वीकार करत अशीच मार्गक्रमणा आपण करू शकतो किंवा आपण यावर सुधारणात्मक उपाययोजना हाती घेऊ शकतो.

समाज म्हणून आपण सकारात्मक बदल कसा घडवून आणू शकतो हे तीन गोष्टी निश्चित करतील. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय भान किंवा जागरूकता. यासाठी आपला दैदीप्यमान भूतकाळाकडे पाहण्यापेक्षा दुसरे उत्तम स्थान नाही. निसर्गाप्रती आदर हा भारतीय परंपरेचा आत्मा आहे. अथर्व वेदात पृथ्वी सूक्त आहे, ज्यामध्ये निसर्ग आणि पर्यावरणाबाबत अलौकिक असे  ज्ञान आहे. अथर्व वेदात अतिशय सुंदर लिहिले आहे, “यस्यां समुद्र उत सिन्धुरापो यस्यामन्नं कृष्टयः संबभूवुः । यस्यामिदं जिन्वति प्राणदेजत्सा नोभूमिः पूर्वपेये दधातु ॥३॥”

म्हणजे भू मातेला नमन. भू माते मध्ये महासागर आणि नद्यांचे पाणी एकत्र सामावले आहे, पेरणी केल्यावर ती धान्य उगवून देते, सर्व चराचर सृष्टीला ती जीवन देते, या जीवनात आम्हाला ती सामावून घेवो.

आपल्या प्राचीन काळात  पंचतत्वाविषयी लिहिले आहे, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश आणि या पाच तत्वांच्या सुसंवादी कार्यावर आपले जीवनमान कसे आधारलेले आहे हे विषद केले आहे. निसर्गाची तत्वे म्हणजे दैवी अभिव्यक्ती आहे.

महात्मा गांधी यांनी पर्यावरणाविषयी विस्तृत लिखाण केले त्याच बरोबर पर्यावरणाविषयी सहानुभूती  आवश्यक असणाऱ्या जीवनशैलीचा अंगीकार केला. त्यांनी विश्वस्तपदाचा सिद्धांत स्थापन केला ज्यामध्ये आपल्यावर, सध्याच्या पिढीवर  जबाबदारी देण्यात आली आहे की त्यांनी, भावी पिढ्यांना स्वच्छ ग्रह वारसा म्हणून सोपवण्याची खातरजमा करावी. जगाला संसाधनांची टंचाई भासू नये अशा पद्धतीने आपण  वापर  ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.

चिरंतन आणि निसर्गाशी सलोखा राखणारी जीवनशैली हा आपल्या संस्कृतीचा एक गुणविशेष आहे. आपल्या समृद्ध परंपरेचा झेंडा आपल्या हाती आहे याची जाणीव झाल्यावर आपल्या कृतींवर त्याचा आपोआप सकारात्मक परिणाम जाणवतो.

दुसरी बाब म्हणजे जनजागृती. पर्यावरणाशी संबंधित प्रश्नाबाबत आपण जास्तीत जास्त चर्चा, संवाद, लिखाण घडवून आणण्याची गरज आहे. त्याच वेळी पर्यावरण विषयी संशोधन आणि कल्पकता यांना प्रोत्साहन देणेही महत्वाचे आहे. जनतेला व्यापक प्रमाणात, पर्यावरणाबाबतची सध्याची आव्हाने आणि ती दूर करण्यासाठीचे मार्ग याबाबत माहिती असेल तेव्हाच हे शक्य होईल.

एक समाज म्हणून, पर्यावरण संवर्धनाशी आपल्या  संलग्नतेची आपल्याला जाणीव होईल आणि आपण नियमितपणे त्यावर चर्चा करू तेव्हा आपोआपच आपण शाश्वत पर्यावरणाविषयी सक्रीय होऊ. म्हणूनच सकारात्मक बदल घडवण्यासाठीचा तिसरा घटक म्हणून  मी, ‘सक्रियता’  नमूद करेन.

या संदर्भात, स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी 130 कोटी भारतीय नागरिक सक्रीय आहेत हे मी आनंदाने सांगू इच्छितो.

शाश्वत भविष्यासाठी थेट संबंध असलेल्या स्वच्छ  भारत अभियानात आम्ही ही सक्रियता पाहिली. भारतातल्या जनतेच्या आशीर्वादाने 85 दशलक्ष कुटुंबाना प्रथमच स्वच्छतागृह प्राप्त झाले. 400 दशलक्ष भारतीय उघड्यावर शौचापासून मुक्त झाले. स्वच्छता विषयक जाळ्याचा 39 % वरून 95 % पर्यंत विस्तार झाला.  नैसर्गिक परीसरावरचा भार कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणारे हे महत्वपूर्ण   प्रयत्न होते.

उज्वला योजनेच्या यशात आपण ही सक्रियता पाहतो. अनारोग्यदायी स्वयंपाकाच्या पद्धतीमुळे श्वसनाशी सबंधित रोगाना निमंत्रण मिळत होते, मात्र या योजनेमुळे घरातले वायू प्रदूषण लक्षणीय कमी झाले. आतापर्यंत पाच कोटी उज्वला गॅस  जोडण्या वितरीत करण्यात आल्या आहेत.यामुळे महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छ आणि उत्तम जीवन जगण्यासाठी मदत होत आहे.

नद्या स्वच्छ करण्याच्या दिशेने भारत झपाट्याने वाटचाल करत आहे. भारताची जीवनरेखा असलेली गंगा नदी अनेक भागात प्रदूषित झाली होती. नमामि गंगे अभियानामुळे हे चित्र बदलत आहे. सांडपाण्यासाठी योग्य पद्धती अवलंबण्यावर  भर देण्यात येत आहे.

अमृत आणि स्मार्ट सिटी अभियानासारख्या आमच्या शहरी विकासाच्या योजनांच्या मूळ स्थानी नगर विकास आणि पर्यावरणाची काळजी याचा समतोल साधला गेला आहे. देशभरातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात आली आहेत. ज्यातून जमिनीची उत्पादकता तर वाढेलच त्याशिवाय जमिनीचे आरोग्यही सुधारेल. त्याचा लाभ येणाऱ्या पिढ्यांना होईल.

“कौशल्य भारत” अभियानाची पर्यावरणाशी सांगड घालत आम्ही  एकात्मिक लक्ष्य ठेवले आहे आणि हरित कौशल्य विकास कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत, सुमारे सत्तर लाख युवकांना पर्यावरण, वन संवर्धन, वन्य जीव आणि हवामान बदल अशा विषयांसंदर्भात,  2021 पर्यंत कौशल्य प्रशिक्षित करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. यामुळे कौशल्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील तसेच पर्यावरण क्षेत्रात स्वयं उद्यमशीलताही विकसित होईल.

आमच्या देशाने नव्या आणि अक्षय ऊर्जा स्रोतांकडे अभूतपूर्व लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या चार वर्षात या क्षेत्राकडे अनेक लोक वळले असून अपारंपारिक ऊर्जा आता स्वस्तही होते आहे.

उज्वला योजनेअंतर्गत, 31 कोटी एलईडी बल्ब वितरित करण्यात आले आहेत. एलईडी बल्बची किंमती आम्ही लक्षणीयरित्या कमी केली, ज्यामुळे लोकांच्या वीज बिलात तर कपात झालीच तर कार्बन उत्सर्जनातही मोठी घट झाली.

पर्यावरणाच्या क्षेत्रात भारत स्वयंस्फूर्तीने करत असलेली कृती आज संपूर्ण जग बघते आहे. 2015 साली पॅरिस येथे झालेल्या “कोप-21” या वाटाघाटींमध्ये भारत आघाडीवर होता, हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आहे. मार्च 2018 मध्ये जगातल्या अनेक देशातल्या नेत्यांनी नवी दिल्लीत एकत्र येत आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जेची सुरुवात केली. सौर शक्तीचे वरदान लाभलेल्या सर्व देशांना एकत्र आणत सौर ऊर्जेच्या क्षमतेच्या मानव आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी वापर करण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे.

आज जग जेंव्हा हवामान बदलाची चर्चा करत आहे त्याचवेळी आम्ही हवामान न्यायाचाही मुद्दा सातत्याने जागतिक व्यासपीठावर मांडतो आहे. आमच्या देशातील गरीब आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे अधिकार आणि हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी हा सामाजिक न्याय आवश्यक आहे. या घटकांनाच हवामान बदलाचा सर्वाधिक सामना करावा लागतो.

जसे मी आधी लिहिल्यानुसार, आमच्या कृतींचा परिणाम दीर्घकाळपर्यंत मानवी संस्कृतीवर होणार आहे. शाश्वत भविष्यासाठी जागतिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे आपल्या हातात आहे. पर्यावरणाच्या तत्वज्ञानाबाबतीत जगाने आपल्या विचारात आमुलाग्र बदल घडवण्याची गरज आहे आणि त्यात मुख्य भर हा केवळ सरकारी नियमांवर न राहता पर्यावरणाच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या जागरुकतेवर असला पाहिजे.

या दिशेने अविश्रांत काम करणाऱ्या सर्व संस्था आणि व्यक्तींचे मी आभार मानतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो असे सगळे कार्यकर्ते समाजात मूलभूत बदल घडवण्यात आघाडीवर असतात. त्यांच्या प्रयत्नात सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळेल अशी मी त्यांना ग्वाही देतो. आपण सगळे मिळून एका स्वच्छ पर्यावरणाची निर्मिती करु, जे मानवाच्या सक्षमीकरणाचा पाया ठरेल.