माझ्या चित्रपटातून ईशान्य भारतातल्या लोकांचे राजकीय स्थान, अस्तित्वाचा संघर्ष आणि जीवन यांचा वेध घेण्याचा प्रयत्न-राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मंजू बोरा

0
905

‘बहत्तर हूरे’ चित्रपटातून किमान एका व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न-निर्माता गुलाबसिंग तन्‍वर

गोव्यामध्ये सुरू असलेल्या इफ्फीच्या ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात दिग्दर्शिका मंजू बोरा यांचा ‘इन द लॅण्ड ऑफ पॉईझन व‍िमेन’ हा ईशान्य भारतातल्या पांगचेंपा भाषेतला चित्रपट आणि संजय पुरणसिंग चौहान यांनी दिग्दर्शित केलेला ‘बहत्तर हूरे’ हा हिंदी चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटानिमित्त या दोन्ही दिग्दर्शकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात इंडियन पॅनोरमा विभागात आपल्या चित्रपटाची निवड होणे हा विशेष अभिमानाचा क्षण आहे, असे मत मंजू बोरा यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या चित्रपटातून आपण ईशान्य भारतातील मूळ रहिवाशांचा जगण्याचा संघर्ष, त्यांचे राजकीय स्थान आणि जीवन या सगळ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ईशान्य भारतात जवळपास 120 बोलीभाषा बोलणारे लोक आहेत आणि या भाषांशिवाय भारताचे अस्तित्व पूर्ण नाही, असा माझा विश्वास आहे, असे बोरा म्हणाल्या. ईशान्य भारतातल्या अत्यंत दुर्गम भागात भारत-चीन सीमेवर या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे, असे बोरा यांनी सांगितले. या भागात केवळ 5 हजार लोकांची वस्ती आहे. अत्यंत निसर्गरम्य अशा या प्रदेशात चित्रीकरण करणे अवघड गोष्ट होती, असे त्यांनी सांगितले. भारतीय लष्कराचीसुद्धा आमच्या तंत्रज्ञांना मदत झाली, असा त्यांनी उल्लेख केला.

 

‘बहत्तर हूरे’ चित्रपटाचे निर्माते गुलाबसिंग तन्‍वर आणि दिग्दर्शक संजय पुरणसिंग चौहान यांनी या चित्रपटाची कथा आणि चित्रीकरणाचे अनुभव सांगितले. मृत्यूनंतर जन्नतमध्ये गेल्यावर बहत्तर हूरे म्हणजे 72 सुंदर पऱ्यांचा सहवास मिळतो यावर विश्वास ठेवून त्यांचा शोध घेणाऱ्या दोन तरुणांची ही कथा आहे, असे चौहान यांनी सांगितले. या चित्रपटात अभिनय केलेले सुप्रसिद्ध अभिनेते पवन मल्होत्रा ही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या चित्रपटात आपण ‘बहत्तर हूरे’च्या कल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे, असे त्यांनी सांगितले. प्रेक्षकांनी स्वत: या चित्रपटाचा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘बहत्तर हूरे’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवणे आव्हानात्मक काम होते, असे निर्माते गुलाबसिंग तनवर यांनी सांगितले. हा चित्रपट बघून समाजातल्या किमान एका व्यक्तीचे मन परिवर्तन झाले तरीदेखील आमचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल, असे तन्‍वर म्हणाले.

 

‘इन द लॅण्ड ऑफ पॉईझन विमेन’ चित्रपटाचा सारांश

अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात विषकन्या असल्याचा समज अजूनही अस्तित्वात आहे.  हा समज दूर करण्यासाठी हा चित्रपट तयार केला आहे. तवांग जिल्ह्यातल्या झेमी थांग भागात आजही अस्तित्वात असलेल्या एका अंधश्रद्धेविषयी थोंग ची यांनी लिहिलेल्या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला आहे. या चित्रपटाला पांगचेंपा भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आले आहे.

 

‘बहत्तर हूरे’ चित्रपटाचा सारांश

दहशतवाद्यांच्या एका प्रशिक्षण शिबिरात बिलाल आणि हकिम या दोन तरुणांना असे सांगितले जाते की ते जर अल्लाच्या नावावर कुर्बान झाले तर त्यांना मृत्यूनंतर जन्नतमध्ये बहत्तर हूरे मिळतील. या मोहाने ते मुंबईत दहशतवादी हल्ला करतात. मात्र, या हल्ल्यात मेल्यानंतर त्यांना लक्षात येते की त्यांना बहत्तर पऱ्या मिळालेले नाहीत तर एका रुग्णालयाच्या शवागारात त्यांची शरीरे बेवारस अवस्थेत पडलेली आहेत. ‘डार्क कॉमेडी’ प्रकारातल्या या चित्रपटातून दहशतवादाकडे वळणाऱ्या जिहादी तरुणांना संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.