माझे अटलजी

0
1585

अटलजी आता आपल्यात नाही. मन हे मानायला तयार नाही. अटलजी माझ्या नजरेसमोर आहेत, स्थिर आहेत. जे हात माझ्या पाठीवर थाप देत होते, जे अत्यंत स्नेहपूर्ण आणि हसरेपणाने मला कवटाळत होते, ते स्थिर(स्तब्ध) आहेत. अटलजींची ही स्तब्धता मला बेचैन करत आहे. अस्थिर करत आहे. डोळे तप्त  आहेत, काही सांगायचे आहे, खूप काही सांगायचे आहे पण व्यक्त करता येत नाही आहे. मी स्वतःची पुन्हा पुन्हा समजूत घालतो आहे की, अटलजी आता या जगात नाही मात्र असे विचार येताच स्वतःला त्यापासून दूरही करतो आहे. अटलजी खरंच आपल्यात नाहीत? नाही. मला त्यांचा आवाज अंतर्मनात साद घालतो आहे, कसं म्हणू, कसं मान्य करू, की ते आता नाहीत!

ते पंचत्वात आहेत. ते आकाश, पृथ्वी, जल, अग्नी, वायू या सर्वात व्याप्त आहेत, ते अटल आहेत, ते आताही आहेत. त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण आजही कालच भेट झाल्यासारखी ताजी आहे. इतका मोठा विद्वान नेता.  जणू काही आरशाच्या पल्याडच्या दुनियेतून आपल्यासमोर आला आहे. ज्यांचा नावलौकिक ऐकला होता, ज्याचं लेखन वाचलं होतं, ज्यांना न भेटताच त्यांच्याकडून इतकं काही शिकलं होतं ते व्यक्तिमत्व माझ्या समोर होतं. जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या तोंडून माझा नामोल्लेख झाला, तेव्हा धन्यता वाटली. पुढचे कित्येक दिवस मला हाक मारणारा त्यांचा आवाज कानावर येत राहिला. तो आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही हे आता कसे मान्य करू.

कधी विचारही आला नाही की अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी लेखणी हाती घ्यावी लागेल. देश आणि संपूर्ण विश्वच अटलजींना एक मुत्सद्दी अमोघ वक्ता, संवेदनशील कवी, विचारवंत लेखक, धारदार पत्रकार आणि विशिष्ट दृष्टी असलेला जन नेत्याच्या रुपात त्यांना जनता ओळखत होती.  परंतु माझ्यासाठी त्यांचे स्थान यापेक्षा कितीतरी मोलाचे आहे. फक्त यासाठी नाही की मला खूप वर्षांपर्यंत काम करण्याची संधी मिळाली परंतु माझे जीवन, माझे विचार, माझ्या आदर्श मूल्यांवर जी छाप अटलजींनी सोडली, जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला त्यामुळे मी भारावून गेलो, प्रत्येक स्थितीमध्ये त्यांनी अटळ राहायला शिकवले.

आपल्या देशात अनेक ऋषीमुनी, संत, परमात्मा यांचा जन्म झाला आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या विकास यात्रेमध्ये असंख्य लोकांनी आपले जीवन समर्पित केले. परंतु स्वातंत्र्यानंतर लोकतंत्राचे रक्षण आणि 21व्या शतकाच्या सशक्त, सुरक्षित भारतासाठी अटलजींनी जे काही केले ते अभूतपूर्व आहे.

त्यांच्यासाठी राष्ट्र म्हणजे सर्वकाही होते. बाकी सगळ्याचे काहीच महत्त्व नाही. ‘इंडिया फर्स्ट-भारत प्रथम’ हा मंत्र त्यांच्या जीवनाचे ध्येय होता. पोखरण देशासाठी जरुरी होते. त्यांनी प्रतिबंध आणि टीका यांची चिंता केली नाही कारण त्यांच्यासाठी देश सर्वोत्तम स्थानावर होता.  सुपर कॉम्प्युटर, क्रायोजेनिक इंजिन नाही मिळाले तरी पर्वा नाही. आम्ही स्वत: बनवू, आम्ही आमच्या स्वत:च्या बळावर आणि प्रतिभेवर तसेच वैज्ञानिक कुशलतेवर आधारित, असंभव असणारे कार्य संभव करून दाखवू, आणि त्यांनी असे केलेही. दुनियेला आश्चर्यचकित केले. फक्त एक ताकद त्यांच्या आत काम करत होती आणि ती म्हणजे ‘देश प्रथम ही जिद्द’.

काल पटलावर लिहिण्याची आणि मिटवण्याची ताकद, हिंमत आणि आव्हानांच्या काळ्या ढगांवर विजय मिळवून सूर्योदय घडवून आणण्याचा चमत्कार त्यांच्या हृदयात होता. कारण त्यांचे हृदय देशासाठी सदैव धडधडत होते. यासाठी जिंकणं किंवा हारणं त्यांच्या मनावर परिणाम करत नव्हते.

सरकार बनले तेव्हाही, सरकार एका मताने पडल्यावरही, त्यांच्या आवाजात पराभवालाही विजयाच्या अशा गगनभेदी विश्वासात बदलण्याची ताकद होती की जिंकणारा देखील हार मानेल.

अटलजी कधीही आडमार्गाने गेले नाहीत. त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात नवीन मार्ग बनवले आणि निश्चित केले. “वादळातही दिवा पेटवण्याची ” क्षमता त्यांच्यात होती. ते जे काही बोलायचे ते थेट जनमानसाच्या हृदयाला भिडायचे. आपले म्हणणे कसे मांडायचे, किती बोलायचे आणि किती न बोलता सोडून द्यायचे यात ते वाक्‌बगार होते.

राष्ट्राची त्यांनी जी सेवा केली , जगात भारतमातेचा मानसन्मान ज्या बुलंदीवर त्यांनी पोहचवला, त्यासाठी त्यांनी अनेक सन्मान देखील मिळविले. देशवासियांनी त्यांना भारतरत्न देऊन आपला गौरवही वाढवला. मात्र ते कुठल्याही विशेषण, कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे होते.

आयुष्य कसे जगायचे, राष्ट्राची सेवा कशी करायची हे त्यांनी आपल्या जगण्यातून इतरांना शिकवले. ते म्हणायचे,” आपण केवळ आपल्यासाठी जगू नये, इतरांसाठीही जगावे… आपण राष्ट्रासाठी जास्तीत जास्त त्याग करायला हवा. जर भारताची स्थिती दयनीय असेल तर जगात आपला गौरव होऊ शकणार नाही. परंतु जर आपण सर्व दृष्टीने सुसंपन्न असू तर जग आपला गौरव करेल. “

देशातील गरीब, वंचित, शोषितांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करत राहिले. ते म्हणायचे, ” गरीबी, दारिद्र्य हा अभिमानाचा विषय नाही तर विवशता आहे, नाईलाज आहे आणि विवशतेचे नाव संतोष असू शकत नाही.” कोट्यवधी देशवासियांना या विवशतेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. गरीबांना अधिकार मिळवून देण्यासाठी देशात आधार सारखी व्यवस्था, प्रक्रियांचे अधिकाधिक सुलभीकरण, प्रत्येक गावापर्यंत रस्ते जोडणे, सुवर्ण चतुष्कोन, देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा या गोष्टी राष्ट्र निर्माणाच्या त्यांच्या संकल्पांशी निगडित होत्या.

आज भारत ज्या तंत्रज्ञानाच्या शिखरावर उभा आहे, त्याची कोनशिला अटलजींनी ठेवली होती. आपल्या काळाच्या खूप दूरचे पाहू शकत होते. स्वप्नदृष्टा होते, मात्र कर्मवीर देखील होते. कवी हृदय, भावुक मनाचे ते होते तसेच पराक्रमी सैनिक मनाचे देखील होते. त्यांनी परदेश प्रवास केला होता. जिथे-जिथे गेले, कायमचे मित्र बनवले आणि भारताच्या हिताचा कायमस्वरूपी पाया रचत गेले. ते भारताच्या विजय आणि विकासाचा आवाज होते.

अटलजींचा प्रखर राष्ट्रवाद आणि राष्ट्रासाठी समर्पण कोट्यवधी देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहिला आहे. राष्ट्रवाद त्यांच्यासाठी केवळ एक नारा नव्हता तर जीवनशैली होती. ते देशाला केवळ एक भूखंड, जमिनीचा तुकडा मानत नव्हते तर एक जिवंत, संवेदनशील घटक म्हणून पाहायचे. “भारत जमिनीचा तुकडा नाही, जिवंत राष्ट्रपुरुष आहे.” ही केवळ भावना नाही तर त्यांचा संकल्प होता ज्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. अनेक दशकांचे सार्वजनिक आयुष्य त्यांनी आपल्या याच विचाराने जगण्यात, धरतीवर उतरवण्यात व्यतीत केले. आणिबाणीने आपल्या लोकशाहीवर जो कलंक लावला होता, तो मिटवण्यासाठी अटलजींनी केलेले प्रयत्न कायम देशाच्या स्मरणात राहतील.

राष्ट्रभक्तीची भावना, जनसेवेची प्रेरणा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल होती. भारत त्यांच्या मनात होता, तनामध्ये भारतीयत्व होते. त्यांनी देशाच्या जनतेलाही आपले आराध्य मानले. भारताचा कण -कण , प्रत्येक दगड , भारताचा प्रत्येक थेंब न थेंब त्यांनी पवित्र आणि पूजनीय मानला.

जितका सन्मान, जितकी उंची अटलजींना प्राप्त झाली तेवढे ते जमिनीच्या नाळेशी जोडले गेले. आपल्या यशस्वीतेच्या प्रभावावर त्यांनी स्वत:चे नियंत्रण ठेवले. देवाजवळ यश, किर्ती यांची कामना करणाऱ्या अनेक व्यक्ती असतात परंतु अटलजी असे होते की त्यांनी-

‘हे प्रभु! मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना।

गैरों को गले ना लगा सकूं, इतनी रुखाई कभी मत देना’

आपल्या देशवासियांना इतक्या सहजतेने आणि सरळतेने जोडण्याची कामना त्यांच्या सामाजिक जीवनाला एका वेगळ्या उंचीवर उभी करते.

ते त्रास सहन करत होते, वेदनेला चुपचाप आतल्याआत सामावून घेत होते आणि सर्वांना आयुष्यभर अमृत देत राहिले. जेव्हा त्यांना कष्ट सहन झाले नाही तेव्हा ते म्हणाले, ‘देह धरण को दंड है, सब काहू को होये, ज्ञानी भुगते ज्ञान से मूरख भुगते रोए।’ त्यांनी ज्ञान मार्गातील अत्यंत गहऱ्या वेदना सुद्धा सहन केली आणि वितराग भावनेने सर्वांचा निरोपही घेतला.

भारत त्यांच्या नसानसात होता तेव्हा विश्वाची वेदना त्यांच्या मर्माला भेदत असे. हिरोशिमासारख्या कवितेचा जन्म याच वेदनेतून झालेला आहे. ते विश्वाचे नायक होते, मातृभूमीचे खरे वैश्विक पाईक होते. भारताच्या सीमांना पार करून भारताची किर्ती आणि करूणेचा संदेश स्थापित करणारे ते आधुनिक बुद्ध होते.

काही वर्षांपूर्वी लोकसभेत जेव्हा त्यांना वर्षातील ‘सर्वश्रेष्ठ संसदपटू’ने सन्मानित करण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, हा देश खूप अद्‌भूत आहे, अनोखा आहे. कुठल्याही दगडाला शेंदूर लावून नमस्कार केला जातो, असा देश अभिनंदनाला पात्र आहे.

आपल्या पुरुषार्थाला, आपल्या कर्तव्य निष्ठेला राष्ट्राला समर्पित करणे हे त्यांच्या व्यक्तित्वाच्या महानतेला प्रतिबिंबीत करते. हा सव्वाशे कोटी देशवासियांचाही खूप मोठा आणि प्रखर संदेश आहे. देशातील साधने, संसाधने यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.  त्याला अनुसरून आपल्याला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला बनवायचा आहे.

नवीन भारताचा हा संकल्प मी माझ्यातर्फे आणि सव्वाशे कोटी देशवासियांतर्फे अटलजींना भावात्मक श्रद्धांजलीच्या रुपात अर्पित करतो. त्यांना नमन करतो.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयींबद्दल व्यक्त केलेल्या भावना)