माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्याकडून राहुल गांधींचे शरसंधान

0
898
 गोवा खबर:सर्जिकल स्ट्राइक बाबत प्रश्रचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेणे माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सुरुच ठेवले आहे.आज पणजी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पर्रिकर यांनी
 राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं. मग त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास बसला असता, अशी उपहासात्मक टीका  केली.
सर्जिकल स्ट्राइक बाबत मुख्यमंत्री पर्रिकर आता बोलू लागले आहे.आयटी धोरणा संदर्भात आयोजित कार्यक्रमात सर्जिकल स्ट्राइक करून आपण गोव्यावरचे देशाचे कर्ज फेडले असल्याचे भाष्य पर्रिकर यांनी केले होते.
भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पर्रिकर यांनी आज थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नेम धरला…
‘सर्जिकल स्ट्राईकची प्रक्रिया व नियोजन हे खूप गुप्त ठेवावं लागतं. त्याविषयी कुणाला पूर्वकल्पना देता येत नाही. पण आम्ही जर लष्करासोबत राहुल गांधी यांना पाठवलं असतं, तर काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राईक झाला यावर विश्वास ठेवला असता ना?,’ असा प्रश्न पर्रिकरांनी उपस्थित केला.
‘मी सर्जिकल स्ट्राईकविषयी राजकीय अर्थानं बोलत नाही. मात्र या ऑपरेशनवर विश्वास बसण्यासाठी विरोधी पक्षातील लोकांना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करानं सोबत न्यायला हवं होतं का?’ अशी विचारणा पर्रिकर यांनी केली.
‘सर्जिकल स्ट्राईकची माहिती फक्त चौघांनाच होती. मी, पंतप्रधान मोदी, लष्कर प्रमुख व मिलिटरी ऑपरेशनचे डायरेक्टर जनरल…
‘केंद्रात पुन्हा मोदी सरकार यायला हवं. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते गरजेचं आहे. विरोधक अल्पसंख्यांकांमध्ये अकारण भीती निर्माण करत आहेत. मुस्लिम मतदारही भाजपसोबत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ते दिसून आलं आहे. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल,असा विश्वास  पर्रिकर यांनी व्यक्त केला.

पर्रीकर झाले भावूक 

अमेरिकेतून स्वादूपिंडाच्या आजारपणातून सुमारे तीन महिन्यांनी परत आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. पर्रीकर व्यासपीठावर आल्यानंतर सभागृहातील अनेक कार्यकर्त्यांनी पर्रीकरांची छबी मोबाईलमध्ये टिपण्यास प्रारंभ केला. पर्रीकर यांनी पहिलाच शब्द उच्चारल्यावर सर्व  भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. या स्वागताने भारावलेल्या पर्रीकर यांचा आवाज कातर झाला व डोळ्यांत अश्रू तरळले.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी म्हणून भाजपच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पणजी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पर्रिकर बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दामू नाईक आदी यावेळी व्यासपीठावर होते.