माजी संरक्षणमंत्री जार्ज फर्नांडिस यांचे निधन

0
1096

गोवा खबर:माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते जार्ज फर्नांडिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते अल्झायमरने त्रस्त होते. आज (दि. 29) सकाळी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या आणि समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांनी फर्नांडिस यांच्या अंत्यसंस्काराबाबत माध्यमांना माहिती दिली. फर्नांडिस यांचा मुलगा परदेशात असून ते भारतात आल्यानंतर बुधवारी अंत्यसंस्कार होणार असल्याचे तसेच फर्नांडिस यांनी पूर्वी व्यक्त केलेल्या दोन्ही पद्धींनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचेही जेटली यांनी सांगितले.

पहिल्यांदा फर्नांडिस यांनी आपल्या मृत्यूनंतर आपले पार्थिव दहन करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु नंतरच्या दिवसांत त्यांनी आपले पार्थिव दफन करण्यात यावे असे म्हटले. त्यांच्या दोन्ही इच्छा आम्ही पूर्ण करणार असून पहिल्यांदा त्यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात येईल आणि त्यानंतर अवशेषांचे दफन करण्यात येणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.

फर्नांडिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सामाजिक, राजकीय, कला क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. फर्नांडिस हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात संरक्षणमंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात पाकिस्तानविरूद्ध कारगिलचे युद्ध झाले. तसेच पोखरणची अणु चाचणीही झाली.

 

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना


 माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

“जॉर्ज साहेब हे देशातील सर्वोत्तम राजकीय नेत्यांपैकी एक होते” असे पंतप्रधानानी म्हटले आहे. स्पष्टवक्ते आणि निर्भीड असलेले जॉर्ज फर्नाडिस एक दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले होते. गरीब आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणारा तो एक खंबीर आवाज होता. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे.

जेव्हा आपण जॉर्ज फर्नांडिस यांचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आयुष्यभर न्यायासाठी लढा देणारे एक धगधगते कामगार नेतृत्व उभे राहते,एक असे नेतृत्व, ज्याच्या प्रभावी वाणीसमोर मोठमोठे राजकीय नेते नामोहरम होत असत. दूरदृष्टी असलेले एक रेल्वेमंत्री आणि देशाला सुरक्षित आणि भक्कम ठेवणारे महान संरक्षण मंत्री …अशी त्यांची तेजस्वी कारकीर्द होती.

त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात, जॉर्ज फर्नांडिस यांनी कधीही आपल्या राजकीय विचारधारेशी तडजोड केली नाही. त्यांनी प्राणपणाने आणीबाणीचा विरोध केला. त्यांची साधी राहणी आणि विनम्रता वाखाणण्यासारखी होती.

त्यांना श्रद्धांजली अर्पण करत मी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लाखो अनुयायांच्या दुःखात सहभागी होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच प्रार्थना!!”