माजी मंत्री तवडकरांची घरवापसी भाजपच्या पथ्यावर?

0
1162
 गोवा खबर: माजी क्रीडामंत्री आणि काणकोणचे माजी आमदार रमेश तवडकर यांनी सोमवारी घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काणकोण मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवलेल्या तवडकर यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली घरवापसी भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
राज्यसभा खासदार आणि भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी मडगावात झालेल्या एका सोहळ्यात त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मीनाक्षी लेखी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, तसेच अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

 तवडकर हे गोव्यातील एसटी समाजाचे प्रभावी नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारल्यावर हा समाज भाजपापासून दूर गेल्याने काणकोणसह किमान तीन ठिकाणी भाजपाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे गोव्यात हा पक्ष अल्पमतात आला होता.
 
यावेळीही तवडकर यांनी सुरुवातीला आपण दक्षिण गोव्यातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असे जाहीर करुन दक्षिण गोव्यातील एसटी बहुल भाग पिंजून काढला होता. या भागातून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळेच प्रदेश महामंत्री सतीश धोंड यांनी तवडकर यांचे मन वळवून त्यांना घरवापसी साठी राजी केले. धोंड यांच्या शिष्टाईमुळेच तवडकर पुन्हा भाजपात आले असून, त्यांना भाजपाची दक्षिण गोव्याची लोकसभा उमेदवारही मिळू शकत असल्याने या घरवापसीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.