माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन

0
1076
 गोवा खबर : माजी उपमुख्यमंत्री तथा म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा (६४) यांचे गुरुवारी निधन झाले. जुने गोवे येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

डिसोझा यांच्या निधनाबद्दल सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.उद्या शुक्रवारी सरकारी कार्यालये आणि शाळांना सुट्टी असणार आहे.शनिवारी डिसोझा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. माजी उपसभापती विष्णू वाघ यांच्या पाठोपाठ डिसोझा यांच्या निधनाची वार्ता आल्याने गोव्यावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना जुने गोवे येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. गेले आठ दिवस ते व्हँटीलेटरवर होते.
डिसोझा हे १९८५ पासून राजकारणात सक्रीय आहेत. १९८५ त्यांनी म्हापशाचे नगरसेवक म्हणून निवडून आल्या नंतर आपली वाटचाल सुरु केली. १९८६ ते १९८८ पर्यंत ते म्हापशाचे नगराध्यक्ष होते. १९९५ मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले आणि १९९८ ते २००० पर्यंत ते नगराध्यक्ष बनले.
१९९९ साली राजीव काँग्रेसच्या उमेदवारीवर ते प्रथम आमदार झाले. त्यानंतर २००२ मध्ये ते भाजपात आले. तेव्हापासून २००२, २००७, २०१२ व २०१७ पर्यंतच्या एकूण चार निवडणुकांमध्ये ते भाजपच्या उमेदवारीवर आमदार झाले. २४ नोव्हेंबर १९९९ रोजी त्यांची पहिल्यांदा मंत्रीमंडळात वर्णी लागली.  त्यावेळी त्यांच्याकडे कायदा व कामगार अशी दोन खाती देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक व नगर विकास ही दोन खाती देण्यात आली. ३ जून २००२ साली ते पुन्हा मंत्री झाले. माहिती तंत्रज्ञान, कायदा, संसदीय व्यवहार व कौशल्य प्रशिक्षण अशी खाती त्यांच्याकडे आली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ९ मार्च २०१२ साली ते पुन्हा मंत्री झाले. नगर विकास, महसूल व कौशल्य प्रशिक्षण खाती त्यांच्याकडे आली. पर्रीकर दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेले त्यावेळी भाजपने लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्रीपद दिले तर १८ नोव्हेंबर २०१४ रोजी डिसोझा यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. उपमुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी आरोग्य, महसूल, नगर नियोजन, नगर विकास व कायदा अशी महत्त्वाची खाती सांभाळली.
१४ मार्च २०१७ रोजी ते पुन्हा मंत्री झाले. नगर विकास, कायदा, संसदीय व्यवहार व प्रोव्हेदोरीया अशी खाती त्यांच्याकडे आली.
 फ्रान्सिस डिसोझा हे त्यानंतर आजारी पडले. उपचारासाठी ते अनेकदा अमेरिकेतही गेले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २४ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांना मंत्रिमंडळातून वगळले. तेव्हाही डिसोझा अमेरिकेत उपचार घेत होते. त्यानंतर फ्रान्सिस आजारीच असायचे. मुंबईलाही उपचार घेऊन ते परतले. हल्लीच त्यांना हेल्थ वे या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना व्हँटीलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
डिसोझा गेली ३९ वर्षे  राजकारणात होते आणि सुमारे २१ वर्षे ते आमदार होते. नगरसेवकपदापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात ते नगराध्यक्ष, पीडीए अध्यक्ष, मंत्री व उपमुख्यमंत्री अशा पदांवर पोहचले.