‘माऊस’चे थाटात प्रकाशन

0
949

“बालकुमारांचे भावविश्व समृद्ध करणारा दिवाळी विशेषांक” – समृद्धी केरकर

”माऊसचा दीपावली विशेषांक मुखपृष्ठापासून कथा-आशयापर्यंत परिपूर्ण असून तो बालकुमारांचे भावविश्व समृद्ध करणारा आहे,” असे उद्गार गोमंतकीय बालसाहित्यिका समृद्धी केरकर यांनी काढले. दसऱ्याच्या दिवशी गोव्यातील केरी सत्तरी येथे ‘विवेकानंद साहित्य संस्कृती अभिवृद्धी मंचा’च्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात समृद्धी केरकर आणि प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या हस्ते ‘माऊस’ दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले.
‘माऊस मल्टिमीडिया’ या प्रकाशन संस्थेसाठी अमृता वाळिंबे यांनी संपादित केलेल्या ‘माऊस’ दिवाळी अंकाचे हे सातवे वर्ष आहे. ‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून विविध पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या या विशेषांकाचे यंदा प्रथमच गोव्यात प्रकाशन करण्यात आले आहे. केरी सत्तरीत पार पडलेल्या या खास प्रकाशन कार्यक्रमासाठी मुलांसोबत पालक व शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ आणि कुमारवयीन मुलामुलींच्या भावनिक व बौद्धिक विकासासाठी कार्यरत असलेले डॉ. रुपेश पाटकर म्हणाले की, ‘माऊस’ विशेषांकातील कथांचा आशय मुलांचा भावनिक बुद्ध्यांक विकसित करणारा आहे. या अंकाच्या वाचनाने मुलांच्या वाचनाच्या आवडीला निश्चितच खतपाणी मिळेल. बालवयातील मुलांना भरपूर चित्रे असलेली पुस्तके आवडतात. ‘माऊस’ने ही गरज नेमकी ओळखली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शिवाजी गाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
‘माऊस’ अंकातील निवडक तीन कथांचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवाचन करण्यात आले. विठ्ठल शेळके यांनी ‘बटलू’, सृष्टी नाईक यांनी ‘पोर गुणाची’ आणि करिष्मा गावस यांनी ‘मोबाईल गँगची हवाई सफर’ या कथांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शुभदा चारी यांनी केले.