मांद्रे, शिरोड्यातून शिवसेना स्वबळावर: नाईक

0
1153

 

गोवा खबर:मांद्रे व शिरोडा पोटनिवडणूक शिवसेना स्वबळावर लढवण्याची तयारी करीत आहे. मांद्रेत भाजप कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात असून ते या निवडणुकीत पाठिंबा देणार असल्याची माहिती शिवसेना गोवा राज्य उपप्रमुख राखी प्रभुदेसाई नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.शिवसेना पक्षाचे दक्षिण गोवा प्रमुख आलेक्सी फर्नांडिस, उल्हास ठाकूर व इरफान खान यावेळी उपस्थित होते.

मांद्रे व शिरोडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची छाननी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ती यादी अंतिम केली जाणार आहे, असे सांगून नाईक म्हणाल्या, मांद्रे व शिरोडा पोटनिवडणूक तेथील जनतेवर लादण्यात आली आहे. निकालांवर प्रत्येकाची नजर असेल. या निवडणुका लादणार्‍यांना जनताच उत्तर देण्यास सज्ज झाली आहे. मांद्रे पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाकडून ‘शिवसेना आपल्या दारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीसंदर्भात जनतेची मते, उमेदवार कसा असावा, त्यांच्याकडून अपेक्षा आदी बाबी मतदारांकडून  या  मोहिमेच्या अंतर्गत जाणून घेतल्या जात आहेत. पुढील आठवड्यात पक्षाचे संपर्क प्रमुख जीवन कामत गोव्यात येणार आहेत. त्यानंतर बैठकीत उमेदवारांची नावे घोषित केली जातील. शिवसेनेचा गोव्यातील  पहिला आमदार या निवडणुकीत मिळण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस तसेच भाजपला जनता कंटाळली आहे. भाजपचे कार्यकर्तेच पक्षावर नाखुश आहेत. मांद्रेतील भाजपचे कार्यकर्ते  संपर्कात असून त्यांचा शिवसेनेला पाठिंबा  असल्याचेही नाईक यांनी सांगितले.