मांद्रेत घरात गांजाची लागवड करणाऱ्या 2 रशियन पर्यटकांच्या पेडणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
278
गोवा खबर: पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पेडणे पोलिसांनी गावडेवाडा-मांद्रे येथील एका फ्लॅटवर सोमवारी छापा टाकून  गांजाच्या लागवडीप्रकरणी दोघा रशियन पर्यटकांना अटक केली. त्याशिवाय हे दोघे ज्या फ्लॅट मध्ये राहत होते त्याच्या मालकावर देखील पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
आलेक्सी पेरेवालोव्ह (३१) आणि आलेक्सी रेब्रिएव (४१) अशी अटक केलेल्या रशियन पर्यटकांची नावे आहेत. मे २०२० पासून ते या फ्लॅटमध्ये रहात होते. पेडणे पोलिसांना खबऱ्याकडून याची माहिती मिळताच त्यांनी धाड टाकून धडक कारवाई केली. त्यांच्याकडे पाच गांजाची रोपे आणि सुकवलेला अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला.
याची बाजारातील किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. याशिवाय रोख २५ हजार रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, हरीश वायंगणकर आणि संजीत कांदोळकर, कॉन्स्टेबल रवी मालोजी, अनिशकुमार पोके, विनोद पेडणेकर, साबाजी राऊळ देवीदास मालकर आणि दीपा विर्नोडकर यांनी या कारवाईत भाग घेतला.जीवबा दळवी यांनी पेडणे पोलिस स्थानकाचा ताबा घेतल्या नंतर पाच दिवसात अमली पदार्थांच्या व्यापारा विरोधात ही दूसरी मोठी कारवाई आहे.