मांडवी पुलाला जॅक सिक्वेरा यांचे नाव द्या

0
1207

गोवा खबर:जनमत कौलामुळे गोव्याला वेगळय़ा राज्याचा दर्जा मिळाला. याकामी डॉ. जॅक सिक्वेरा यांचे योगदान मोठे असून त्यांचा उचित सन्मान होणे अजूनही बाकी आहे. राज्य सरकारने मांडवी पूल किंवा झुआरी नदीवर उभारल्या जाणाऱ्या पुलाला डॉ. सिक्वेरा यांचे नाव देऊन त्यांचा  सन्मान करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली आहे.

मडगावात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्व धर्म सलोख्याने नांदत आल्याने गोव्याला शांतताप्रिय प्रांत अशी ओळख मिळाली आहे. ती आम्ही जपून ठेवायला हवी. उगाच विविध धर्मियांमध्ये तेढ निर्माण होणार नाही यासाठी काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सिक्वेरा हे ख्रिस्ती होते म्हणून त्यांचा योग्यरित्या सन्मान होत नसल्याचा समज डोके वर काढत असल्याचा दावा आलेमाव यांनी केला.

जनमत कौलामुळे आम्हाला आमची वेगळी अस्मिता प्राप्त झाली. त्यामुळेच गोव्याचा चौफेर विकास झाला. याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. गोवा वेगळा झाला नसता तर सुदिन ढवळीकर हे मंत्री कसे बनले असते, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.