मांडवी नदीवरील केबल स्टेड पूलासाठी १ लाख घनमीटर कॉंक्रीटचा वापर

0
1161

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिसऱ्या मांडवी पूलाचे आज उद्घाटन

 

गोवा खबर:आज रविवारी २७ जानेवारी रोजी गोवा स्थित मांडवी नदीवरील नवीन पूलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, नैकानयन, जलस्रोत, नदी विकास व गंगा पुनरुथ्थान मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. नव्याने बांधण्यात आलेला हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून ५.१ किमी लांबीचा, चार पदरी तसेच केबल धारीत आहे.

 

सदर पूल पणजी शहरातील वाहतुकीचा भार कमी करेल. या पूलामुळे बंगळूरू कडून फोंडा मार्गे येणारी व मुंबई कडे जाणारी वाहने पणजी मध्ये येणार नाहीत. पणजी शहरातील कदंबा बस स्थानक परिसरातील वाहनांची गर्दी देखील या पूलामुळे कमी होईल. सुमारे ६६ हजार वाहने रोज या रस्त्याचा वापर करतात, गोव्यातील पर्यटन काळात व रोजच्या अधिक रहदारीच्या वेळांमध्ये यामुळे वाहतूक समस्या उद्भवत असते.

 

याशिवाय गोवा राज्यातील पर्यटन विकासाचा विचार करता नवीन पूल स्थानिक तसेच पर्यटकांसाठी सौंदर्यपूर्ण असे आनंददायक ठिकाण असेल.   

 

संपूर्णपणे भारतीय असलेल्या या पूलासाठी १ लाख घनमीटर उच्च शक्ती व कार्यक्षमता असणारे कॉंक्रीट वापरण्यात आले आहे (जे ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेतील जलतरण तलावाच्या मापाचे ४० तलाव बांधण्यासाठी लागेल). याशिवाय २० हजार चारचाकींच्या वजनाइतके म्हणजे १३ हजार मेट्रिक टन गंजप्रतीरोधक मजबूत पोलाद, सहा फुटबॉल मैदासाठी आवश्यक इतके ३२ हजार स्केअर मीटर स्ट्रक्चरल स्टील प्लेट्स, गोवा ते दिल्लीचे अंतर व्यापू शकेल इतके म्हणजे १८०० किलोमीटर हाय टेन्सिल प्री-स्ट्रेसिंग स्टील स्ट्रॅंड, या २ लाख ५० हजार टन जड असलेल्या या ब्रिजसाठी (५७० बोईंग-७४७ जम्बो जेटच्या वजनाइतके) २६५ गोलाकार ब्रिज बियरिंग्ज व ८८ अत्याधुनिक सिंगल प्लेन मधील उच्च टेंसिइल स्ट्रॅटेन्स केबल्स हर्प प्रकार केबल स्टेप सिस्टम रीअल-टाइम फोर्स मॉनिटरींग टेक्नोलॉजीसह सुसज्ज या पुलाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आले आहे.