मांडवीवरील तिसऱ्या पुलाचे 27 रोजी उद्धाटन

0
674
गोवा खबर:पणजीतील मांडवी नदीवरील देशातील 3 नंबरच्या केबल स्टेड पूलाचे उद्धाटन 27 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते होणार आहे.हा सोहळा रात्री 7.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आणि गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी ही माहिती दिली.सुमारे 600 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पूलाचा अर्धा खर्च केंद्र सरकारने उचलला आहे.27 रोजी उद्धाटन सोहळा पार पडल्या नंतर 29 पासून हा पूल लोकांना वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या पूलावरुन दुचाक्या आणि रिक्शा यांची वाहतूक करता येणार नाही.
उद्धाटन सोहळा 1 तास 20 मिनिटे चालणार असून आज सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सोबत चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.पूलाला स्थानिक दिवंगत नेत्यांची नावे दिली जावित अशी मागणी होत असली तरी पुलाचे नाव ठरवण्याचा अधिकार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला असून तेच याबाबत योग्य तो निर्णय घेतील असे स्पष्ट करत विनाकारण नावा वरुन वाद करणे योग्य नसल्याचे ढवळीकर म्हणाले.
मांडवी नदीवरील तिसऱ्या पूलावरुन ताशी 50 किमी वेगाने वाहने हाकण्याची मुभा आहे.पुलावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्याआधारे चलन दिले जाणार आहे.
26 जानेवारी रोजी गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या हस्ते पूजा केली जाणार असून त्यानंतर 9 वाजता पाऊसकर यांच्या हस्ते तेथे उभारलेल्या 100 फूटी ध्वजाचे रोहण केले जाणार आहे.27 रोजी उद्धाटन सोहळा झाल्या नंतर 28 तारीखला लोकांना पाहण्यासाठी हा पुल उपलब्ध असणार आहे.29 जानेवारी पासून पुलावरुन रितसर वाहतूक सुरु केली जाणार आहे.
29 ला वाहतूक सुरु झाल्या नंतर पहिले 8 दिवस वाहतुकीचे निरीक्षण करून त्यानंतर राजधानी पणजीसाठी नवीन वाहतूक प्लान बनवला जाणार आहे.