मांडवीतील कॅसिनोंना मुदतवाढ

0
943

 

गोवाखबर:मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. दोन दिवसांत या संबंधीचा आदेश जारी केला जाईल. सप्टेंबर २०१७ पासून ३१ मार्च २०१८ पर्यंत या कॅसिनो जहाजांना मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था झालेली नसल्यामुळे त्यांना मांडवीतच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील सहा महिन्यांसाठी या कॅसिनोंना मुदतवाढ दिली आहे.

गेल्या चार वर्षात पाच ते सहावेळा कॅसिनोंना मांडवी नदीत राहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. गेल्या जून-जुलैमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मग सप्टेंबरमध्ये आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. येत्या दि. 31 मार्चला मांडवी नदीतील कॅसिनोंच्या परवान्यांची तथा मांडवी नदीत राहण्यासाठीची कॅसिनो जहाजांची मुदत संपत होती. तथापि, दरवेळी मुदत संपायला आली की, सरकार मांडवी नदीतील कॅसिनोंना सहा महिन्यांची मुदतवाढ देतेच. मुख्यमंत्री अमेरिकेत असताना देखील मांडवी नदीतील कॅसिनोंची काळजी गोवा प्रशासनाने न चुकता घेतली. मांडवीतून कॅसिनो अन्यत्र नेण्यासाठी आम्ही सहा महिन्यांत धोरण तयार करू, अशा प्रकारची घोषणा गेल्या चार वर्षात सरकारने पाच-सहावेळा केली आहे. विधानसभेत धोरण मांडले जाईल, असेही दोनवेळा सांगण्यात आले होते पण सरकारने धोरणही तयार केले नाही व कॅसिनोंसाठी गेमिंग कमिशनचीही नियुक्ती केलेली नाही.

1 एप्रिलपासून दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मांडवी नदीत कॅसिनो राहू शकतील, असे मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुर केलेल्या नव्या प्रस्तावात म्हटले आहे.