महिला लघुपटकर्मींना ‘सहित’चे आवाहन – मार्च 2019 मध्ये ‘विस्फी’ची दुसरी आवृत्ती

0
1640
गोवा खबर:‘सहित’ संस्थेच्यावतीने आयोजित देशातील एकमेव महिला दिग्दर्शकांच्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव म्हणजेच ‘वुमन्स इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (विस्फी)साठी दिग्दर्शिकांना आवाहन करण्यात येत आहे. सदर महोत्सवाचे हे सलग दुसरे वर्ष असून फक्त महिला दिग्दर्शकांनी तयार केलेल्या लघुपट आणि माहितीपटांचा समावेश या स्पर्धात्मक महोत्सवामध्ये याहीवर्षी मार्च महिन्यामध्ये होणार आहे.
‘विस्फी’साठी महिला दिग्दर्शकांनी आपला कमाल 25 मिनिटे वेळमर्यादेतील कोणत्याही विषयावरील लघुपट किंवा माहितीपट पाठवता येईल. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत चित्रित केलेला लघुपट/माहितीपट या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ‘विस्फी’मध्ये सहभागी होण्यासाठी दिग्दर्शिकांना वयाचे बंधन नसून, आपल्या लघुपटाच्या दोन डीव्हीडी, लघुपटाचे ए 4 आकाराचे पोस्टर आणि विहित नमुन्यात भरलेला अर्ज 15 जानेवारी 2019 पर्यंत पाठवून देण्याचे आवाहन ‘सहित’च्यावतीने करण्यात आले आहेे.
पहिली दिग्दर्शिका एलिस गाय ब्लाचे यांच्या 50 व्या स्मृतीदिननिमित्ताने  ‘विस्फी’ची पहिली आवृत्ती गोव्यामध्ये अत्यंत उत्साहात पार पडली. देश-विदेशातील महिला दिग्दर्शकांनी ‘विस्फी’मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. सिनेक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दिग्दर्शिकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याचप्रमाणे महिला दिग्दर्शकांच्या  संख्येत गुणात्मकदृष्ट्या वाढ व्हावी, यासाठी ‘सहित’च्यावतीने सुरू करण्यात आलेला ‘विस्फी’ आता गोव्यासह देशातील किमान तीन वेगळ्या शहरांमध्येही आयोजित करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे ‘सहित’च्या किशोर शिंदे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी wisffigoa@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा 94231 58370, 78879 44694 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.