महिला दिग्दर्शकांसाठी लघुपट महोत्सव

0
999
 गोव्यात होणार देशातील पहिलाच महोत्सव
 ‘सहित’च्यावतीने करण्यात आले आयोजन
पणजी:लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती करणार्‍या महिला दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यातील ‘सहित’ संस्थेच्यावतीने प्रथमच आंतरराष्ट्रीयस्तरावरील लघुपट स्पर्धा आणि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशापध्दतीचा हा देशातील पहिलाच लघुपट महोत्सव असल्याचे ‘सहित’च्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
देशात आणि परदेशातही अनेक संस्थांच्यावतीने विविध लघुपट तसेच सिनेमहोत्सवांचे आयोजन करण्यात येते. पण या सगळ्यांमध्ये महिला दिग्दर्शकांना प्रामुख्याने प्रोत्साहन देईल अशा महोत्सवाची वानवा दिसत होती. देशात आणि जगभरातही अनेक विविध वयोगटातील मुली-महिला मोठ्याप्रमाणात लघुपटांची निर्मिती करत आहेत. पण त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांसमोर ठळकपणे येत नाहीत. ही बाब निदर्शनास आल्यामुळेच आम्ही सदर महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आल्याचे या महोत्सवाचे संकल्पक आणि ‘सहित’चे व्यवस्थापकीय संपादक किशोर शिंदे यांनी सांगितले.
या महोत्सवामध्ये कोणत्याही वयोगटातील मुली-महिलांनी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१७ या काळात दिग्दर्शित केलेल्या कमाल ३० मिनिटांपर्यंतच्या लघुपट, माहितीपटांच्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. गोव्यामध्ये होणार्‍या या महोत्सवामधील विजेत्या लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत देशातील निवडक शहरांमध्येही करण्याचे नियोजन आहे. अधिक माहितीसाठी wisffigoa@gmail.com इथे इमेल पाठवण्याचे, @wisffigoa या फेसबुक पेजला भेट देण्याचे किंवा ९४२३१५८३७०, ९१७२३६८१६८, ७८८७९४४६९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.