महिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा !

0
874
हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
गोवा खबर: पणजी येथील बसस्थानकातील एका शौचालयात एका पुरुषाने बुरखा घालून प्रवेश केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीरतेने हाताळावा आणि शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रणरागिणीच्या शिष्टमंडळाने उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी  गोपाळ पार्सेकर यांची भेट घेऊन केली.
 रणरागिणीच्या वतीने एक निवेदन या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळामध्ये रणरागिणीच्या राजश्री गडेकर, शुभा सावंत, महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा  हेमश्री गडेकर, संचालिका  रूपा नाईक, संचालिका  वनिता पडवळ, संचालिका प्रीती पार्सेकर आणि सचिव  संगीता शेटकर यांचा सहभाग होता.
 शौचालयात एका पुरुषाने बुरखा घालून प्रवेश करण्याच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. महिलांचे जीवन आज असुरक्षित बनले आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार झाला नाही, असे एकही वृत्त नाही, असा एक दिवसही नसतो. सरकारला महिलांची सुरक्षा हा प्रश्‍न गंभीर वाटत नाही, असे दिसून येते. त्यामुळे वरील प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना घोषित करून त्याची तात्काळ कार्यवाही करावी. या घटनेला अनुसरून सरकार दोषी व्यक्तीची सखोल चौकशी करून या दुष्कृत्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का ? या सर्वामागे नेमके कोण आहे ? हे शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.