महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पर्रिकर पुन्हा सक्रिय

0
1043

गोवा खबर:फेब्रूवारी मध्ये तब्बेत बिघडल्याने सुरूवातीला मुंबई आणि 5 मार्चपासून 14 जून पर्यंत अमेरिकेत उपचार घेऊन गोव्यात परतलेल्या मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आज सकाळी  माशेल येथील कौटुंबीक दैवत आणि पणजी येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कामास सुरुवात केली.पर्वरी येथील सचिवालयात जाऊन पर्रिकर यांनी लागलीच फाइल्स हातावेगळ्या करण्यास सुरुवात केली आहे.मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडून पर्रिकर यांनी आढावा घेतला असून पावसाळी अधिवेशन 20 जुलै पासून आयोजित करण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबीयांसह माशेल येथील मल्लीनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर सकाळी 10 वाजता ते पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात पोचले.पर्रिकर दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पणजी हा पर्रिकर यांचा मतदारसंघ असल्याने भाजप पदाधिकारी आणि पर्रिकर यांचे चाहते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.पर्रिकर मंदिरा समोर कार मधून उतरून पोलिसांच्या गराडयात मंदिरात गेले.तेथे देवीचे दर्शन घेऊन एक प्रदक्षिणा मारून त्यांनी मदिरा शेजारील गणपतीचे दर्शन घेतले.मंदिराच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी पर्रिकर यांचे घोषणा देऊन स्वागत केले.पर्रिकर यांनी जनतेचे स्वागत स्वीकारून कार्यालयीन काम सुरु करण्यासाठी पर्वरी येथील सचिवालयात रवाना झाले.