गोवा खबर: गुजरातमध्ये आजपासून 28 जूनपर्यंत तर कोकण,गोवा,कर्नाटक किनारपट्टी, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात संपूर्ण आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील तीन दिवसांसाठी इशारा देण्यात आला आहे.

पुढच्या 48 तासांत नाशिक, वलसाड, दमण आणि दीव येथे दमणगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते.

मुंबईसह उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आणि भरतीच्या उंच लाटा यामुळे पूरसदृश स्थिती उद्‌भवण्याची शक्यता आहे.

पश्चिम घाटात उगम होऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांच्या पातळीत मुसळधार पावसामुळे पटकन वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे आणि महामार्गावरील जुने पूल येथे आवश्यक ती दक्षता बाळगण्याची गरज आहे.

गोवा, महाराष्ट्रातील ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग, उत्तर कर्नाटक, उडपी, दक्षिण कर्नाटक या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.