महाराष्ट्र,हरयाणात 21 ऑक्टोबर रोजी निवडणुका;24 ऑक्टोबरला निकाल

0
1054
गोवा खबर: महाराष्ट्र आणि हरयाणात कोण दीवाळी साजरी करणार आणि कोणाची होळी होणार याचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची तर 2 नोव्हेंबर रोजी हरयाणा विधानसभेची मुदत  संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी तर हरयाणात 1.82 कोटी मतदार मतदनाचा हक्क बजावणार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी तर हरयाणात 90 जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात निवडणुकीसाठी १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने गुह्यांची सर्व माहिती देणे आवश्यक आहे. 27 सप्टेंबर ला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे.
दोन्ही ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.4 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर पर्यंत आहे.21 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी मतदन होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.