मला माझ्या वडीलांना गमवायच नाही

0
1338
चिमुकल्या अनया गावसची मुख्यमंत्र्यांना आर्त साद
गोवा खबर:21 दिवसांचे लॉक डाउन सुरु असताना लोकांच्या रेट्यापुढे झुकत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी किराणा मालाची दुकाने चोवीस तास सुरु ठेवण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना पचलेला नाही.सोशल मीडिया वरुन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून जोरदार मागणी होऊ लागली असताना पीर्ण येथे नर्सरी मध्ये शिकत असलेल्या अनया गावस या चिमूरडीने पोलिसात असलेल्या आपल्या वडीलांची चिंता वाटत असल्याने मुख्यमंत्र्यांना केलेले आवाहनामुळे सगळ्याची मने पिळवटून निघाली आहेत.
22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यू यशस्वी केल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याला जोडून आणखी तीन दिवस जनता कर्फ्यूत वाढ केली होती.दरम्यान पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉक डाउन जाहीर केल्यामुळे आवश्यक जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची संधी लोकांना मिळाली नव्हती.मध्ये फक्त एक दिवस सकाळी 6 ते 11 दरम्यान लोकांची मागणी लक्षात घेऊन सुरु करण्यात आले होते.
त्यानंतर मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकाने बंद होती.राज्यात लॉक डाउनची अंमलबजावणी कडक सुरु होती.दरम्यानच्या काळात अन्नधान्य,दूध आणि भाजीपाला मिळत नसल्याने लोकांचा रोष वाढतच होता.विरोधक आणि लोकांचा दबाव वाढू लागल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवार पासून किराणा मालाची दुकाने 24 तास सुरु राहतील अशी घोषणा केली होती.
गोव्यात कोरोनाचे 3 रुग्ण सापडले असून होम क्वारंटाइन केलेले अनेकजण खुले आम फिरत असल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.त्यामुळेच अनया सारख्या अनेकांची चिंता वाढली आहे.
किराणा माल,दूध आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी हाताळण्याचे काम लोकांमध्ये मिसळून पोलिसांना  करावे लागत असल्याने पोलिसांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.
पिर्ण येथे नर्सरी मध्ये शिकत असलेल्या अनयाचे वडील पोलिसात आहेत.ड्यूटी करताना त्यांना कोरोनाचा धोका असून देखील लोकांमध्ये मिसळून काम करावे लागत आहे.
अनयाला सुद्धा हा धोका सतावत आहे.गर्दीत मिसळून काम केले तर काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अनयाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विनंती करत आपल्या वडीलांसह इतर पोलिसांना सुट्टी देऊन या धोक्या पासून वाचवावे अशी आर्त साद घातली आहे.मला माझ्या वडीलांना गमवायच नाही असे भावनिक आवाहन देखील तिने केले आहे.अनयाने लोकांना हात जोडून विनंती केली आहे.ती म्हणते लॉक डाउन यशस्वी करा. काही दिवस भाजी आणि दूध मिळाल नाही तर काही बिघडणार नाही. तिचा हातात आपल्या मागणीचे पोस्टर घेतलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
दरम्यान आज सकाळ पासून किराणा माल,भाजीपाला आणि दूध खरेदी करण्यासाठी येत असलेल्या लोकांची गर्दी होऊ न देता सगळी व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पोलिस यंत्रणा करत आहे.