पणजी:उत्तर गोव्यातील मये गावातील केळबाईवाडया जवळ काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने 2 ते 3 महिन्याच्या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाल्याने या बछडयाने जागीच प्राण सोडले.
मये-केळबाईवाडा येथे काल रात्री देवीचा जत्रोत्सव असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती.खाण उद्योग बंद असल्याने जंगल भागात वन्य प्राण्याचा वावर वाढला आहे.काल रात्री एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात असताना रस्ता ओलांडत असताना 2 ते 3 महिन्याच्या मादी बछडयाचा वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन बछडयाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे
अपघाताची माहीती मिळताच प्राणीमित्र अमृत सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली.भर रस्त्यावर बछडा मरून पडला असल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.अखेर सिंग यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत बछडयाचा मृतदेह सुरक्षित ठिकाणी नेऊन वन विभागाकडे सुपुर्द केला.आज त्या बिबट्याच्या बछडयाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.2 वर्षापूर्वी याच ठिकाणी बिबट्याच्या बछडयाचा अपघाती मृत्यू झाला होता.