मध्यम उत्पन्न गटांसाठी गृहकर्जावरील व्याज अनुदान योजनेला आणखी 15 महिन्यांची मुदतवाढ

0
918

केंद्र सरकारने आज जाहीर केले की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) गृहकर्जावरील व्याज अनुदानाचा लाभ आता मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांनाही मिळणार असून या योजनेला आणखी 15 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

गृहनिर्माण सचिव दुर्गाशंकर मित्रा यांनी आज मुंबईत एनएआरईडीसीओने आयोजित केलेल्या ‘गृहनिर्माण आणि पायाभूत विकास गुंतवणूकदार परिषदेला’ संबोधित करताना ही घोषणा केली. ते म्हणाले की, सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या व्याज सवलतींचा लाभ घेण्यासाठी मध्यम उत्पन्न गटांतील लाभार्थ्यांना आणखी मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्यावर्षी 31 डिसेंबर रोजी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर 2017 पर्यंत मध्यम उत्पन्न गटासाठी सीएलएसएस लागू केले होते. यामध्ये 6 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना 9 लाख रुपयांच्या कर्जावर 20 वर्षांसाठी व्याजात 4 टक्के सवलत मिळेल. तर 12 ते 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना व्याजदरात 3 टक्के सवलत मिळेल.

2022 पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करताना मिश्रा यांनी खासगी गुंतवणूकदारांना परवडणाऱ्या घरांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर मिश्रा यांनी एनएआरईडीसीओच्या 30 सदस्यीय प्रतिनिधी मंडळांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्यांकडे सरकार लक्ष देईल असे आश्वासन दिले.

निवासी मालमत्तेच्या खर्चात जीएसटी आणि अन्य करांचा वाटा एक तृतीयांशपेक्षा अधिक असल्याबद्दल प्रतिनिधी मंडळाने चिंता व्यक्त केली.