मद्यव्यावसायीकांना ॲपवर माहिती देण्याचा निर्णय रद्द न केल्यास आंदोलन:कामत

0
969
गोवा खबर: गोव्यातील बार व तावेर्न मालकांना मद्याच्या खरेदी-विक्रीची माहिती दररोज मोबईल ॲपवर टाकण्याचे बंधनकारक करणारा अबकारी कर खात्याचा आदेश सरकारने त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांच्याकडे करत सरकारने त्वरीत हा आदेश मागे न घेतल्यास तमाम बार व तावेर्न मालक तसेच मद्य व्यावसायींकाना घेऊन आम्ही रस्त्यावर येणार,असा इशारा विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिला आहे.

राज्याची आर्थिक परिस्थीती नाजुक आहे. पर्यटन व्यवसाय मंदीत आहे. अशावेळी सरकारने बार व तावेर्न व्यावसायिंकावर जाचक अटी टाकल्या तर त्याची झळ सामान्य लोकांना बसेल,असे कामत म्हणाले.
विरोधी पक्षनेते कामत यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
गोव्यातील लहान बार व तावेर्न व्यवसाय हा मर्यादीत मनुष्यबळावर चालतो. काही गोमंतकीयांचा हा वडिलोपार्जीत व्यवसाय असुन, कुटूंबाचे सदस्य व घरच्या महिला हा व्यवसाय सांभाळतात. त्यांना आधुनिक मोबाईल उपकरणे व ॲप बद्दल माहितीच नसते,याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.
सरकारने असले नियम व अटी लागु करण्या अगोदर संपुर्ण गोव्यात अखंडीत मोबाईल नेटवर्क सेवा देण्याची व्यवस्था करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगताना, सरकारने ते तंत्रज्ञान सामान्य लोकांना शिकवीण्याची जबाबदारी घ्यावी,अशी मागणी कामत यांनी केली आहे.
जगप्रसिद्ध  ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक दिवाळखोरीत गेल्याने गोव्यात येणारे पर्यटक कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसण्याची भीती व्यक्त केली जात असताना, अबकारी खात्याने असा आदेश काढणे दुर्देवी आहे. शॅक व्यावसायीक सुद्धा अडचणीत अाहेत हे सरकारने ध्यानात ठेवावे,असे कामत यांनी सुनावले आहे.
सरकारने त्वरीत हा आदेश मागे न घेतल्यास, गोव्यातील तमाम बार व तावेर्न मालक तसेच मद्य व्यावसायींकाना घेऊन आम्ही रस्त्यावर येणार हे सरकारने लक्षात ठेवावे,असा इशारा कामत यांनी दिला आहे.